जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘रॅपिड टेस्ट’ची सुविधा २४ तास सुरू ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:42 AM2021-04-27T04:42:15+5:302021-04-27T04:42:15+5:30
वाशिम : अत्यावश्यक रुग्णांचे त्वरित निदान होऊन त्यांच्यावर तातडीने औषधोपचार मिळून त्यांचा जीव वाचावा या दृष्टिकोनातून येथील जिल्हा स्त्री ...
वाशिम : अत्यावश्यक रुग्णांचे त्वरित निदान होऊन त्यांच्यावर तातडीने औषधोपचार मिळून त्यांचा जीव वाचावा या दृष्टिकोनातून येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात रॅपिड टेस्टची सुविधा २४ तास सुरू ठेवण्याची मागणी येथील भाजप नगरसेविका तथा जिल्हा नियोजन समिती सदस्या करुणा राजू कल्ले यांनी २६ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनाव्दारे केली आहे.
सद्य परिस्थितीत जिल्हा स्त्री रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत रॅपिड टेस्ट सुरू असते. सायंकाळी ५ नंतर रुग्णांची टेस्ट केल्या जात नाहीत व त्यांच्याजवळ पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चाचणी अहवाल नसल्यामुळे या रुग्णाला भरती करून घेण्यास टाळाटाळ केली जाते. अशा प्रसंगी त्यांना उपचार मिळत नाहीत. त्यामुळे गंभीर रुग्ण सायंकाळी ५ च्यानंतर येत असेल तर त्याची रॅपिड टेस्ट करण्यात यावी व त्याचा अहवाल रुग्णाला देण्यात यावा. अशा वेळी रुग्णांना उपचारांची गरज असल्यास त्याला त्वरित भरती करून घेण्यात यावे. जेणेकरून गोरगरीब जनतेचे हाल होणार नाहीत. बाहेर गावावरून येणाऱ्या रुग्णाला दवाखान्याची माहिती नसते. अशा वेळी जिल्हा स्त्री रुग्णालयात २४ तास रॅपिड टेस्ट सुविधा सुरू ठेवल्यास रुग्णांच्या आजाराचे त्वरित निदान होऊन अहवालाच्या आधारे रुग्णाला तेथेच भरती करून त्याला त्वरित उपचार मिळू शकते व रुग्णाचे प्राण वाचू शकतात. या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन जिल्हा स्त्री रुग्णालयात रॅपिड टेस्टची सुविधा २४ तास सुरू ठेवून रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी कल्ले यांनी केली आहे.