शहरात नियंत्रण, महामार्गावरील हॉटेल्स, ढाबे मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:36 AM2021-03-14T04:36:34+5:302021-03-14T04:36:34+5:30
जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २६ फेब्रुवारीपासून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत डेअरी, दूध विक्री करणारी ...
जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २६ फेब्रुवारीपासून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत डेअरी, दूध विक्री करणारी दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाला १५ मार्चपर्यंत मुदतवाढही देण्यात आली आहे. यात भोजनालये, खानावळी, ढाब्यांवर केवळ पार्सल सुविधा ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. शहराच्या हद्दीत येणाऱ्या उपाहारगृहांसह भोजनालयात या आदेशाचे पालन होत आहे. त्यावर प्रशासनाचे नियंत्रणही आहे; परंतु शहराच्या हद्दीबाहेर महामार्गांवर असलेले ढाबे आणि खानावळी मात्र रात्री उशिरापर्यंत सुरूच राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
------------------------
वाशिम-कारंजा, मालेगाव-अकोला मार्गावर अधिक प्रमाण
जिल्ह्यातून अमरावती, नागपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड, अकोला, औरंगाबाद आदी जिल्ह्यातून रात्री धावणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. त्यात प्रामुख्याने मालवाहू वाहनांसह खासगी ट्रॅव्हल्सचे प्रमाण सर्वाधिक आहे. रात्री उशिरापर्यंत ही वाहने धावत असतात. त्यातही वाशिम-कारंजा आणि मालेगाव-अकोला, कारंजा-मालेगाव या मार्गाने ही वाहतूक अधिक असते. त्यामुळे याच मार्गावरील ढाबे आणि खानावळी रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याचे प्रमाण अधिक आहे.
-----------------------