बोंडअळी नियंत्रणासाठी बाधित पाती, फुले, बोंडे कापा; कृषी विभागाचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 06:03 PM2018-08-17T18:03:15+5:302018-08-17T18:06:10+5:30
वाशिम : कपाशीच्या पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी बोंडअळीने बाधित झालेले पाती, बोंडे आणि फुले तोडून टाकावी, असा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कपाशीच्या पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. कीटकनाशकांचा आता या किडीवर काही परिणामही होत नसल्याचे दिसत आहे. आता यावर नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी बोंडअळीने बाधित झालेले पाती, बोंडे आणि फुले तोडून टाकावी, असा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात येत आहे.
अमरावती विभागात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कृषी विभागाच्यावतीने या किडीवर नियंत्रणासाठी मार्गदर्शन सभा आणि फेरोमेन सापळे लावण्याचे आवाहन केले. तथापि, या सर्व प्रयत्नानंतरही काहीच फायदा झाला नाही. गुलाबी बोंडअळीच्या जीवनचक्रातील घटक वातावरणात चार महिने टिकून राहतात, त्यामुळे एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे, वेळेवर पीक काढणे, कपाशीच्या हंगामापूर्वी आणि पीक कापणीनंतर शेतात स्वच्छता राखणे, कपाशीचे अवशेष अर्थात पºहाटी, गळलेली बोंडे दीर्घकाळ शेतात न ठेवणे, सतत कापूस न घेता पीक फेरपालट करणे, रासायनिक खतांचा आवश्यक तेनुसारच वापर करणे आदी बाबींची काळजी घ्यावी लागते; परंतु शेतकºयांकडून त्याची फारशी दखल घेण्यात येत नाही. यंदाही कपाशीवर या अळीचा प्रादुर्भाव आटोक्यावर बाहेर जात असल्याने कृषी विभागाकडून शेतशिवारांची पाहणी करून शेतकºयांना कपाशी पिकातील बोंडअळी बाधित पाती, फुले आणि बोंडे तोडण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अभाव आणि पिकांची फेरपालट न केल्याने हा प्रकार यंदाही दिसत आहे. फेरोमेन सापळे कपाशीच्या पिकांत तांत्रिक पद्धतीने लावतानाच शेतकºयांनी बाधित झालेली बोंडे, पाती आणि फुले तोडून टाकावीत, असा आमचा सल्ला आहे.
-दत्तात्रय गावसाने,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम.