न उगविणाऱ्या बियाण्यांवरून ‘वादंग’!
By admin | Published: June 29, 2017 01:24 AM2017-06-29T01:24:22+5:302017-06-29T01:24:22+5:30
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा : समाजकल्याणच्या योजना राबविण्याला मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मानोरा तालुक्यात महाबीजचे बियाणे न उगविल्यानंतरही, कृषी विभागाच्या चमूने पाहणी केली नसल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत सभागृह दणाणून सोडले. याप्रकरणी चौकशी करून दोन दिवसात नुकसानभरपाई अहवाल सादर करण्याचे निर्देश पीठासीन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर सदस्य शांत झाले.
जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात २८ जून रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दुपारी १ वाजता सुरू झाली. सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख तर मंचावर उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, सभापती विश्वनाथ सानप, सुधीर पाटील गोळे, पानुताई जाधव व यमुना जाधव आदींची उपस्थिती होती. सभेला सुरुवात होताच जिल्हा परिषद सदस्य सचिन पाटील रोकडे यांनी महाबीज बियाण्याची रिकामी बॅग परिधान करून सभागृहाचे लक्ष वेधून घेत मानोरा तालुक्यातील न उगविलेल्या महाबीजच्या बियाण्याचा मुद्दा उपस्थित केला. मानोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी महाबीजचे बियाणे पेरले; मात्र बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. असे असतानाही कृषी विभागाच्या चमूने घटनास्थळाची पाहणी केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी रोकडे यांनी लावून धरली. या मुद्याला अन्य जिल्हा परिषद सदस्य व उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दुजोरा दिला. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे, या मागणीने सभागृह दणाणून सोडले. सदस्यांची मागणी लक्षात घेऊन पीठासीन अधिकारी देशमुख यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश कृषी विकास अधिकाऱ्यांना दिले. दोन दिवसात चौकशी करून नुकसानभरपाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देशमुख यांनी केल्या.
जिल्हा परिषद सदस्य विश्वास गोदमले यांनी कंझरा रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचा मुद्दा उपस्थित केला. या प्रश्नावर ठोस आश्वासन मिळत नसल्याचे पाहून गोदमले यांनी सभागृह सोडणे पसंत केले. सन २०१६-१७ या वर्षात समाजकल्याण विभागाच्या काही योजना राबविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या योजना सन २०१७-१८ या वर्षात राबविण्यासाठी सभागृहाने मंजुरी देण्याचा मुद्दा समाजकल्याण विभागाने सभागृहासमोर ठेवला. या मुद्याला सभागृहाने सर्वानुमते संमती दिली. जिल्हा परिषद सदस्य गजानन अमदाबादकर यांनी शेतकऱ्यांविषयीचे प्रश्न उपस्थित केले. ग्रामपंचायत स्तरावर पर्जन्यमापक यंत्रणा उभारण्यात यावी, यासाठी जिल्हा परिषदेने निधीची तरतूद करावी, अशी मागणी अमदाबादकर यांनी केली. सभेत जिल्हा परिषद सदस्य हेमेंद्र ठाकरे, विकास गवळी, सचिन पाटील रोकडे, चक्रधर गोटे, देवेंद्र ताथोड यांच्यासह सदस्यांनी सहभाग नोंदविला. दुपारी १ वाजतापासून सुरू झालेली ही सभा रात्री ७ वाजेपर्यंत चालली.
जि.प.तील अस्वच्छतेवर अध्यक्षांचे ‘ताशेरे’
स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविली जाते. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या आवारात, स्वच्छता गृह व पायऱ्यांजवळ अस्वच्छता असल्याने ही बाब विसंगत असल्याचा मुद्दा जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी मांडला. जिल्हा परिषदेत नियमितपणे साफसफाई झाली पाहिजे, अशा सूचना देशमुख यांनी बांधकाम विभाग व सामान्य प्रशासना विभागाला केल्या. यापुढे ही बाब खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही अध्यक्षांनी दिला.