Coroana Efect : पोलिसांनी केला शिरपूरचा आठवडी बाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 05:07 PM2020-03-18T17:07:02+5:302020-03-18T17:07:10+5:30
आठवडी बाजार न भरण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवर दिलेल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) - ‘कोरोना व्हायरस’पासून सावधगिरी म्हणून ग्राम पंचायत प्रशासनाने आठवडी बाजार बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. तथापि, शिरपूर येथील बुधवारचा आठवडी बाजार सुरू असल्याने आणि नागरिकांनी तेथे गर्दी केल्याने १८ मार्च रोजी शिरपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आठवडी बाजार बंद केला.
सुरक्षितता म्हणून सध्यस्थितीत आठवडी बाजार न भरण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवर दिलेल्या आहेत. त्यानुसार शिरपूर येथेही ग्रामपंचायतच्यावतीने आठवडी बाजार न भरविण्याचा सूचना १७ मार्च रोजी संबंधित व्यावसायिकांना दिल्या होत्या. मात्र बुधवार, १८ मार्च रोजी शिरपूर येथे आठवडी बाजार भरविण्यात आला. सदर बाजार आसेगाव रोडवरील नियोजित ठिकाणी न भरविता गावातील गुजरी चौकात भरविण्यात आला. त्यामुळे सहाजिकच दुकानांची संख्या व ग्राहक यामुळे गर्दी झाली. सदर बाब पोलिसांच्या लक्षात येताच शिरपूर पोलिसांच्यावतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे यांनी गुजरी चौकात येऊन बाजार बंद केला. त्यामुळे व्यापाºयांची एकच तारांबळ उडाली. मात्र आठवडी बाजार पुढील काही काळासाठी भरविल्या जाणार नसल्याने भाजीपाला उत्पादकांचे मोठे नुकसान होणार आहे.