पोहरादेवीत महंतासह ७ जणांना कोरोना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 12:53 AM2021-02-26T00:53:40+5:302021-02-26T00:53:54+5:30
महंत कबीरदास महाराज व कुटुंबीयांनी यांनी २१ फेब्रुवारीला चाचणी केली होती.
मानोरा (जि. वाशीम) : राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी शक्तीप्रदर्शन केलेल्या पोहरादेवी येथील सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, यामध्ये महंत कबीरदास महाराज व त्यांच्या कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. शिवाय गावातून गुरुवारी तब्बल १२३ जणांचे नमूने चाचणीसाठी गेले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
एरवी पोहरादेवी तालुक्यातून जितके नमूने चाचणीसाठी जातात, तितके एकट्या गावातून गेल्यामुळे तालुक्याची आरोग्य यंत्रणा ॲलर्ट मोडवर आली आहे. २३ फेब्रुवारीच्या शक्तीप्रदर्शनानंतर तालुक्यातून २१९ नमूने चाचणीसाठी गेले आहेत. हा आकडादेखील नेहेमीपेक्षा मोठा असल्याने शक्तीप्रदर्शनातून कोरोना फैलाव झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
महंत कबीरदास महाराज व कुटुंबीयांनी यांनी २१ फेब्रुवारीला चाचणी केली होती. त्यानंतरही ते मंगळवारी दिवसभर मंत्री राठोड व इतरांच्या निकट संपर्कात आले होते. गुरुवारी उघड झालेल्या माहितीनुसार, ते आणि त्यांच्या कुटुंबातील चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आणखी काही नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती पोहरादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध जाधव यांनी ‘लोकमत’ला दिली.
निवासी विद्यालयातील ४६ मुले बाधित
दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथे मतिमंद निवासी विद्यालयातील ४६ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अंत्रोळी येथील शाळा सुरू करण्यात आली. काही विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याने बुधवारी चाचणी केल्यावर २१ विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. गुरुवारी एकूण ४६ विद्यार्थी पॉझिटिव्ह आले.