कोरोना आला; इतर आजार कमी झाले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:09 AM2021-01-08T06:09:28+5:302021-01-08T06:09:28+5:30
२०२० मध्ये मार्च महिन्यात देशात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने २३ मार्चपासून लाॅकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली. जुलै महिन्यापर्यंत ...
२०२० मध्ये मार्च महिन्यात देशात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने २३ मार्चपासून लाॅकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली. जुलै महिन्यापर्यंत लाॅकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी झाली. त्यानंतर अनलाॅकचे टप्पे सुरू झाल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले. गोरगरीब तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिक हे सरकारी रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे उपचारार्थ धाव घेतात. सन २०१८ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्यरुग्ण तपासणीचा आकडा (ओपीडी) चार लाख ९८ हजार ७८१ असा हाेता. २०१९ मध्ये बाह्यरुग्ण तपासणी ही सहा लाख सहा हजार ४४७ होती तर २०२० मध्ये एक लाख ६० हजार ७९० पर्यंत तपासणीचा आकडा खाली आला. कोरोनाकाळात मार्च ते जुलै यादरम्यान बहुतांश नागरिक हे घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे सर्दी, ताप, जलजन्य आजार, हिवताप, डेंग्यू आदी आजारांचे प्रमाण २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये कमी असल्याचे दिसून येते.
०००
कोरोनाच्या भीतीने सरकारी रुग्णालयांत येणे टाळले
देशात मार्च महिन्यापासून तर जिल्ह्यात जून महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यामुळे अनेकांनी सरकारी रुग्णालयात येण्याचे टाळले. दुसरीकडे लाॅकडाऊनमुळे बहुतांश नागरिक घरातच असल्याने ताप, हिवताप, डेंग्यू व अन्य साथरोगांचे प्रमाणही घटले.