कोरोना ठरतोय अडसर, शाळाबाह्य मुले शोधताना शिक्षकांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:41 AM2021-03-05T04:41:36+5:302021-03-05T04:41:36+5:30
वाशिम : शाळाबाह्य मुले शोधण्याची मोहीम सध्या शिक्षण विभागाकडून हाती घेण्यात आली आहे; मात्र कोरोना संसर्गाच्या संकटामुळे या कामात ...
वाशिम : शाळाबाह्य मुले शोधण्याची मोहीम सध्या शिक्षण विभागाकडून हाती घेण्यात आली आहे; मात्र कोरोना संसर्गाच्या संकटामुळे या कामात अडथळा निर्माण झाला आहे. घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम करावे लागत असल्याने शिक्षकांची दमछाक होत आहे; तर भटक्या जमातींच्या झोपड्यांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्याकरिता १० मार्चपर्यंत विशेष शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत शाळेत कधीही दाखल न झालेली मुले, शाळेत आहेत; परंतु शिक्षणाकडे दुर्लक्ष झालेली मुले, प्राथमिक शाळेत यापूर्वी एक महिन्यापेक्षा अधिककाळ गैरहजर असलेली मुले, रोजगारानिमित्त स्थलांतर करणाऱ्या कुटुंबातील मुलांचा शोध घेऊन त्या सर्वांना शाळेत दाखल करून शिक्षणाच्या हक्काची पूर्तता करण्याच्या उद्देशातून शिक्षण विभागाने ही मोहीम हाती घेतली; मात्र त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.
.......................
अधिकारी अद्याप फिरकलेच नाही!
१) जिल्ह्यातील सर्वच भागात कोरोना संसर्गाचे संकट अधिकच गंभीर झाले असून, दैनंदिन आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शाळाबाह्य मुलांचा शोध घेताना शिक्षकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. अधिकारी तर अद्याप ग्रामीण भागात फिरकलेदेखील नाहीत.
२) शाळाबाह्य शोध मोहिमेंतर्गत ३ ते ६, ७ ते १४ आणि १५ ते १८ वर्ष या वयोगटातील मुलांचा शोध घेण्याचे शिक्षण विभागाचे निर्देश आहेत. त्यानुसार, गावोगावी पथक नेमून मोहीम राबविण्यात येत आहे; मात्र स्थलांतर करणाऱ्या मजूर कुटुंबांच्या झोपड्यांवर एकही शिक्षक अद्याप पोहोचलेला नाही.
...........................
७९८
शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी जिल्ह्यात नेमलेली पथके
१,५९६
एकूण कर्मचारी संख्या
.............
तालुकानिहाय पथके
वाशिम - १७२
मंगरूळपीर - १३३
कारंजा - १३५
रिसोड - १४३
मालेगाव - ११३
मानोरा - १०२
..........................
ग्रामसेवक संघटना काय म्हणते?
शाळाबाह्य शोध मोहिमेत गावपातळीवरील प्रमुख अधिकारी असलेल्या ग्रामसेवकांचा सहभाग अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र बहुतांश गावांमध्ये ग्रामसेवकांचे या मोहिमेला कुठलेही सहकार्य मिळत नसल्याचे दिसत आहे. सध्या कोरोना संसर्गाचे संकट ऐरणीवर असून, सर्वच शाळा बंद आहेत. अशास्थितीत शासनाने शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याची मोहीम राबवायला नको होती, असे ग्रामसेवक संघटनेचे म्हणणे आहे.
.............
कोट :
शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक गावात एक पथक नेमण्यात आले आहे. त्याच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात येत आहे. सध्या कोरोनाचे संकट वाढल्याने या मोहिमेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही; मात्र शिक्षक व कर्मचारी आपापले काम इमानेइतबारे करत आहेत.
- अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), वाशिम
.............
एकही बैठक नाही
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कामकाजाचे नियोजन करण्यासंबंधीच्या बैठका टाळण्यात येत आहेत. शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासंबंधीही अद्यापपर्यंत एकही बैठक झालेली नाही; मात्र यासंबंधीच्या सूचना सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.