गर्दी टळली तरच कोरोनाला प्रतिबंध शक्य- हृषीकेश मोडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 05:36 PM2020-03-21T17:36:50+5:302020-03-21T17:36:57+5:30
जिल्हाभरात प्रशासनाकडून राबविल्या जाताहेत प्रभावी उपाययोजना
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : चीनमधील वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना आजाराने अल्पावधीतच जगभरातील अनेक शहरे बाधीत झाली. राज्यात या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न सुरू असून वाशिम जिल्ह्यातही प्रशासनाने प्रभावी उपाययोजना अंमलात आणल्या. यासंदर्भात जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्याशी साधलेला हा संवाद...
कोरोना आजाराचा प्रसार कसा होतो?
कोरोना विषाणूचा आजार व प्रसार मुख्यत्वे खोकल्यातून व शिंकण्यातून जे थेंब बाहेर पडतात, त्यातूनच मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे निष्पन्न होत आहे. या आजारात संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांनी गर्दी टाळून योग्य खबरदारी घ्यावी व स्वत:चा तसेच इतरांचाही बचाव करावा.
काळजी कशी घ्यावी?
कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी प्रामुख्याने गर्दी टाळणे आवश्यक आहे. लग्न समारंभ, मरणधरणाचे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमांमधून होणारी गर्दी किमान काही दिवस टाळण्यासाठी नागरिकांनी स्वत:च पुढाकार घ्यावा; अन्यथा कोरोनाला प्रतिबंध करणे शक्य होणार नाही. पानटपºया, चहाची दुकाने, मद्यविक्री बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचे सक्तीने पालन व्हायला हवे.
उपाययोजना कोणत्या आहेत?
‘कोरोना’ला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. त्यात प्रामुख्याने पोहरादेवी, उमरी खु. येथील यात्रा रद्द करण्यात आली. २३ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत ८ मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. कुठेही समारंभ, मेळावे व इतर कार्यक्रमांमुळे गर्दी होणार नाही, याबाबत दक्षता घेणे, शहरी व ग्रामीण क्षेत्रातील मद्यविक्री १९ मार्चपासून बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. महानगरातून वाशिममध्ये येणाºया वाहनांमधील प्रवाशांची ग्रामीण रुग्णालयांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी शासन, प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी देखील गर्दी टाळून स्वत:सोबतच इतरांचाही बचाव करण्यासाठी सतर्क राहायला हवे. काळजी न घेतल्यास कोरोनावर नियंत्रण अशक्य असणार आहे.