कोरोना : बाजार समित्यांसह उपबाजारांतील व्यवहार बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 11:13 AM2020-04-08T11:13:00+5:302020-04-08T11:13:08+5:30
तीन बाजार समित्यांसह दोन उपबाजारांचे व्यवहार अद्यापही पूर्णपणे सुरळीत होऊ शकले नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या अटींवर जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समितींमध्ये जीवनावश्यक शेतमालाच्या खरेदी-विक्री व्यवहार सुरु ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष हृषीकेश मोडक यांनी ३० मार्च रोजी दिला. तथापि, काही तांत्रिक अडचणींमुळे तीन बाजार समित्यांसह दोन उपबाजारांचे व्यवहार अद्यापही पूर्णपणे सुरळीत होऊ शकले नाहीत. आता कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी बाजार समित्यांत आवश्यक उपाय योजना सुरू असून, येत्या दोन दिवसांत सर्व बाजार समित्यांचे व्यवहार सुरळीत होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक रवि गडेकर यांनी मंगळवारी दिली. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांतील धान्य खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. तथापि, पणन सचांलक, पणन संचलनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या २६ आणि २७ मार्च रोजीच्या कार्यालयीन परिपत्रकान्वये सर्व बाजार समित्यांत कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होणार नाही, याची दक्षता घेऊन जिवनावश्यक शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे कामकाज सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी हृषिकेष मोडक यांनी जिल्हा उपनिबंधकांशी चर्चा करून कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी गर्दी कमी करणे, आवश्यक खबरदारी घेण्याच्या अटींवर जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समितींमध्ये जीवनावश्यक शेतमालाच्या खरेदी-विक्री व्यवहार सुरु ठेवण्याचा आदेश ३० मार्च रोजी दिला. त्यानंतर मालेगाव आणि कारंजा येथील बाजार समित्यांत व्यवहार सुरूही झाले. तथापि, वाशिम, मंगरुळपीर, मानोरा आणि रिसोड येथील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होऊ शकले नाहीत. दरम्यान, मंगरुळपीरचा उपबाजार असलेल्या शेलुबाजार येथे मंगळवारी ५० क्विंटल शेतमालाची खरेदी झाली. आता सर्व बाजार समित्यांत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी उपाय योजना करण्यात येत असून, येत्या दोन दिवसांत सर्व बाजार समित्यांतील व्यवहार सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिली.
(प्रतिनिधी)