कोरोना डेथ ऑडिट; ५० टक्के रुग्णांना आधीपासूनच होते आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 AM2021-06-18T04:28:55+5:302021-06-18T04:28:55+5:30
कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील एकूण ७ हजार ४३० जणांना संसर्गाची बाधा झाली होती; तर १५८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ...
कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील एकूण ७ हजार ४३० जणांना संसर्गाची बाधा झाली होती; तर १५८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. फेब्रुवारी २०२१ नंतर आलेली संसर्गाची दुसरी लाट मात्र जिल्ह्यासाठी महाभयंकर ठरली. या लाटेत १७ जूनअखेरपर्यंत ३३ हजार ७३१ नवे रुग्ण आढळले; तर ४५४ जणांची प्राणज्योत मावळली. आधीपासूनच मधुमेह जडलेला असताना कोरोनाचा संसर्ग जडलेल्या नागरिकांचा मृतकांमध्ये सर्वाधिक समावेश आहे. यासह किडनीचे विकार, उच्च रक्तदाब असलेल्या वृद्धांनी उपचाराला अपेक्षित साथ दिली नाही. त्यामुळे त्यांनाही प्राणास मुकावे लागले. ज्यांना पूर्वीचे कुठलेही आजार नाहीत, असे ४० हजारांपेक्षा अधिक नागरिक कोरोनातून ठणठणीत बरे झाले आहेत.
.................
वयोगटनिहाय महिला/पुरुषांचे मृत्यू
१५ वर्षांपर्यंत - ०१
१६ ते ३०-०८
३१ ते ४५ - १०५
४६ ते ६० - २०४
६१ ते ७५ - २३०
७६ ते ९०-५५
९१ पेक्षा अधिक - ०९
..................
एप्रिल आणि मे महिन्यात सर्वाधिक मृत्यू
जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत एप्रिल आणि मे महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाने सर्वाधिक सुमारे २०० रुग्णांचा मृत्यू झाला. या दोनच महिन्यात जिल्ह्यातील सर्वच कोविड रुग्णालये कोरोना संसर्गाच्या रुग्णांनी हाऊसफुल्ल झालेले होते. आरोग्य विभागाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली; मात्र उपचारास साथ न देणाऱ्यांना प्राणास मुकावे लागले.
...................
सर्वात जास्त मधुमेहाचे
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ४५४ जणांचा मृत्यू झाल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसून येत आहे.
कोरोनाची बाधा झाल्यानंतर मृत्यू झालेले असले तरी मृतकांपैकी अनेकांना प्रामुख्याने पूर्वीच मधुमेहाचा आजार जडलेला होता.
उच्च रक्तदाब, फुप्फुसाचे आजार जडलेल्या रुग्णांनीही कोरोना संसर्ग झाल्यानंतर विविध स्वरूपातील आरोग्यविषयक अडचणींचा सामना केला. त्यातील काहींना मृत्यूने जवळ केले.
..........................
श्वास बंद होऊन मृत्यू
वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून कोरोना डेथ ऑडिट करण्यात आले. उपचारादरम्यान श्वास बंद पडल्यानेच कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे मुख्य कारण दर्शविण्यात आले आहे. उपचारात स्टिराॅईडचा वापर करावा लागत असल्याने मधुमेहींसाठी ते धोकादायक ठरून अशा रुग्णांचा मृतकांमध्ये सर्वाधिक समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. मधुकर राठोड यांनी दिली.