कोरोनाने हिरावली २३ बालकांची आई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 11:41 AM2021-06-15T11:41:30+5:302021-06-15T11:41:35+5:30
Corona Virus New : बालकांचा सांभाळ करताना बाबांना (वडील) तारेवरची कसरत करावी लागत आहे.
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गत तीन महिन्यांच्या कालावधीत कोरोनाने अनेकांना दु:खद धक्के दिले. कुणाचा भाऊ/बहिणी हिरावले, कुणाचे बाबा, कुणाचे आजी/आजोबा तर कुणाची आई हिरावली. आईविना बालकांच्या पालनपोषणाची कल्पनाही करता येत नाही. आतापर्यंतच्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील २३ बालकांची आई कोरोनाने हिरावली असून, या बालकांचा सांभाळ करताना बाबांना (वडील) तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनजीवन अधिक प्रभावित झाले. मार्च ते मे या तीन महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. याच तीन महिन्यांत अनेकांना परिवारातील सदस्यही गमवावे लागले. कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी शासनाने जिल्हास्तरीय कृती दलावर सोपविली आहे.
कोरोनामुळे आई-वडील दोघांचाही मृत्यू झाला असल्यास त्यांच्या पाल्याला मदत करण्याची घोषणा सरकारने केली. घरातील कर्ता पुरुष म्हणून वडिलांचा मृत्यू झाला असल्यास बालकांसाठी बाल संगोपन योजना व विधवा महिलासाठी निराधार योजनेतून लाभ दिला जातो.
आईचा मृत्यू झाल्यास बालकासाठी बालसंगोपन योजनेचा लाभ लागू होऊ शकतो. परंतु, पुरुषाला अर्थसाहाय्य देणारी अन्य शासकीय योजना नाही. दुसरीकडे आईचा मृत्यू झाल्याने बालकाच्या पालनपोषण, संगोपनाचा, भावनिक जिव्हाळ्याचा प्रश्नही समोर येत आहे.
कोरोनाने जिल्ह्यातील २३ बालकांची आई हिरावली आहे. आईविना या बालकांचे मायेचे छत्र हरविले असून, पालनपोषण करताना बाबांना मोठी कसरत करावी लागत आहे.
कोरोनामुळे आई-बाबा असे दोन्ही पालक किंवा एक पालक हिरावलेल्या बालकांचा सर्व्हे करण्यात येत आहे. आतापर्यंतच्या सर्व्हेनुसार जिल्ह्यातील २३ बालकांच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शासकीय निकषानुसार या बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे.
- सुभाष राठोड
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, वाशिम