Corona Efect : राष्ट्रीय महामार्गांची कामे ‘लॉकडाउन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 11:09 AM2020-04-01T11:09:19+5:302020-04-01T11:09:24+5:30
कोट्यवधींच्या मशीन रस्त्यावर बेवारस ऊभ्या असल्याचे चित्र चारही मार्गावर दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ जारी करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांची कामे बंद पडली असून, कामासाठी आणलेल्या कोट्यवधींच्या मशीन रस्त्यावर बेवारस ऊभ्या असल्याचे चित्र चारही मार्गावर दिसत आहे.
सुमारे अडीच वर्षांपूर्वी अकोला-हिंगोली, यवतमाळ-नांदेड, नागपूर-औरंगाबाद, अकोला-आर्णीसह इतर दोन मार्गाना महामार्गाचा दर्जा प्रदान करण्यात आला होता. या महामार्गाच्या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात सततचा अवकाळी पाऊस आणि पाणीटंचाईमुळेही या कामांत मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून या कामांना वेग देण्यात आला. चारही दिशेने होत असलेल्या या महामार्गांच्या कामाचे कंत्राट आठ कंत्राटदार कंपन्यांना विभागून देण्यात आले होते. आता ही कामे अंतीम टप्प्यात असताना कोरोना विषाणूचा संसर्ग चीनमधून भारतात आणि महाराष्ट्रातही पसरला आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कठोर भूमिका घेतली असून, देशभरात १५ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जारी केले, तर राज्यात कठोर संचारबंदीची अमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वच शासकीय कामे स्थगित करण्यात आली. त्यात वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचाही समावेश आहे. ही कामे बंद पडल्याने कामावर असलेले कामगार आणि कंत्राटदार आपापल्या गावी परत गेले असून, काही निवडक मंडळी कामासाठी उभारलेल्या प्रकल्पावर थांबून आहे. तथापि, कामासाठी वापरण्यात येणारी विविध यंत्रे, रोलर, मालवाहू वाहने कंत्राटदार कंपनीच्या प्रकल्पावर ठेवण्यात आली आहेत, तर प्रत्यक्ष रस्ता कामावर सिमेंटचे मिश्रण टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अवजड मशीन आणि रोलर रस्त्यावरच बेवारस स्थितीत पडून असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्या मंगरुळपीर-मानोरा, मंगरुळपीर-वाशिम, मालेगाव-मेहकर, अकोला-शेलुबाजार आदि रस्त्यांवर कोट्यवधींच्या मशीन गेल्या आठवडाभरापासून उभ्याच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, या कामावर कार्यरत असलेले काही कामगार अद्यापही वाहतूक बंद असल्याने जिल्ह्यात अडकून पडले असून, जिल्हा प्रशासनाने त्यांची माहिती संकलित करून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.
बहुतांश कामगार परतले
जिल्ह्यात सर्वत्र सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या कामगारांसह बाहेरच्या राज्यातील कामगारही होते. तथापि, लॉकडाऊनच्या आदेशानंतर या कामगारांसाठी धान्य पुरवठा करणे आणि भोजन तयार करणे अडचणीचे ठरणार होते. त्यामुळे कंत्राटदार कंपन्यांनी जिल्हा बंदीच्या आदेशापूर्वीच बहुतांश कामगारांना त्यांच्या गावी परत पाठविले असून, आता काही मंडळीच ठिकाणावर चौकीदारी करीत आहे.