जऊळका येथे कोरोनाविषयक मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:42 AM2021-05-13T04:42:13+5:302021-05-13T04:42:13+5:30
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे आरोग्य विभागाकडून सोमवारी कोरोनाविषयक मार्गदर्शन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना लस घेऊन ...
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे आरोग्य विभागाकडून सोमवारी कोरोनाविषयक मार्गदर्शन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना लस घेऊन सुरक्षित व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
.............
क्रीडांगणावर शुकशुकाट
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहे. भीतिपोटी क्रीडांगणावरही शुकशुकाट असल्याचे दिसून येत आहे.
.................
रिसोडची बाजारपेठ निर्मनुष्य
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण मिळविण्याकरिता जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यास प्रतिसाद मिळत असून, रिसोड येथील बाजारपेठ कडकडीत बंद राहत असून, रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसत आहे.
....................
ऑटोचालकांना प्रवासी मिळेना
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख चढला असून, अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. यामुळे ऑटो प्रवासाला मुभा मिळूनही प्रवासी मिळत नसल्याने चालक संकटात सापडले आहेत.
.....................
महिलांना मधुमक्षिका पेट्यांची प्रतीक्षा
वाशिम : गतवर्षी कोरोना संकट उद्भवण्यापूर्वी बचतगटातील महिलांना मधुमक्षिका पेट्या मिळाल्या. मात्र, अपेक्षित फायदा झाला नाही. मध्यंतरी पुन्हा प्रशिक्षण देण्यात आले. असे असताना आता मधुमक्षिका पेट्या मिळण्याची प्रतीक्षा लागून आहे.
...............
बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित
वाशिम : जिल्ह्यात या वर्षी २६ बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यासाठी लागणारा निधीही प्राप्त झाला असून, काही ठिकाणचे बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित होऊन त्याचा वापर सुरू झाल्याची माहिती कृषी विकास अधिकारी विकास बंडगर यांनी दिली.
..............
वाशिमात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
वाशिम : शहरातील अंतर्गत रस्त्यांचे काही महिन्यांपूर्वी नूतनीकरण झाले. मात्र, अल्पावधीतच रस्ते खराब झाले आहे. काही रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले असून, नागरिक त्रस्त झाले आहेत.
.............
कूपनलिकांच्या पाणीपातळीत घट
वाशिम : गतवर्षी चांगले पर्जन्यमान झाल्याने या वर्षी पिकांच्या सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले. आता मात्र कूपनलिकांची पाणीपातळी हळूहळू घटत चालली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
...........
वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण
वाशिम : तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण झाले असून, काही लोकांनी जमीन वहितीखाली आणली आहे. त्याचा शोध घेऊन अतिक्रमण हटवावे, अशी मागणी वृक्षप्रेमी माधवराव मारशेटवार यांनी बुधवारी केली.
.............
सौरऊर्जा वापराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
वाशिम : अपारंपरिक ऊर्जास्रोत म्हणून सौरऊर्जा वापरावर भर देण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र, प्रशासकीय कार्यालयांमध्येच त्याचे पालन होत नाही. काही कार्यालयांचा अपवाद वगळल्यास बहुतांश कार्यालयांनी याकडे दुर्लक्ष केलेले आहे.
...............
कठोर नियमामुळे थुंकण्यावर नियंत्रण
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाला आळा बसावा, यासाठी दुकाने, पानटपऱ्या कडकडीत बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. यामुळे खर्रा, पुड्यांची विक्री घटली असून, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावरही नियंत्रण मिळाल्याचे दिसून येत आहे.
.............
रस्ता दुभाजक उभारण्याची मागणी
वाशिम : शहरातून रिसोडकडे जाणाऱ्या लाखाळापर्यंतच्या रस्त्यावर चांगल्या दर्जाचे दुभाजक उभारण्यात यावे. यामुळे वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल, अशी मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते संदीप चिखलकर यांनी बुधवारी बांधकाम विभागाकडे केली.