कोरोनाची धास्ती; मोफत प्रवेशासाठीच्या कागदपत्रांसाठीही पालक येईनात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 04:58 PM2020-07-01T16:58:19+5:302020-07-01T16:58:33+5:30
अमरावती विभागातील ३० टक्के पेक्षा अधिक पालकांनी कागदपत्रे सादर केली नाहीत.
- संतोष वानखडे
वाशिम : आरटीई अंतर्गत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पालकांना मोबाईलवर संदेश पाठविण्यात आले. अमरावती विभागातील ३० टक्के पेक्षा अधिक पालकांनी कागदपत्रे सादर केली नाहीत. यावरून पालकांनीही कोरोनाची धास्ती घेतल्याचे दिसून येते. दरम्यान, राज्यातील एकूण ९३३१ शाळेतील एक लाख १५ हजार ४४६ जागेसाठी एक लाख ९२६ बालकांची मोफत प्रवेशासाठी निवड झालेली आहे. १ जुलैपर्यंत एकाही बालकाचा प्रवेश झालेला नाही.
आरटीई अंतर्गत शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेबाबत आॅनलाईन अर्ज मागवून १७ मार्च २०२० रोजी लॉटरी काढण्यात आली. लॉटरीव्दारे राज्यातील एकूण ९३३१ शाळेतील एक लाख १५ हजार ४४६ जागेसाठी एक लाख ९२६ बालकांची मोफत प्रवेशासाठी निवड झालेली आहे. यामध्ये अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यातील २३२३ मोफत जागेसाठी २२७८ बालक, बुलडाणा जिल्ह्यात २७८५ जागेसाठी १७४२, अमरावती जिल्ह्यात २४८६ जागेसाठी २४५६, वाशिम जिल्ह्यात १०११ जागेसाठी ९७६, यवतमाळ जिल्ह्यात १७०१ जागेसाठी १६४७ बालकांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे पुढील प्रवेश प्रक्रियेचे कामकाज प्रभावित झाले. २० जून दरम्यान शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार फक्त या शैक्षणिक वर्षासाठी शाळास्तरावर कागदपत्राची प्राथमिक पडताळणी करुन व संकलन करुन तालुकास्तरीय पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश देण्यात येणार आहेत. दुसरीकडे कोरोनाची धास्ती असल्याने अमरावती विभागातील ३० टक्क्यापेक्षा अधिक पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी संबंधित शाळेशी संपर्क साधलेला नाही. कोणताही बालक मोफत प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून यावर्षी कागदपत्र पडताळणी व प्रवेशासाठी तीन वेळा संधी दिली जाणार आहे. तीन वेळाही पालक नियोजित तारखेला अनुपस्थित राहिले तर चवथ्यांदा प्रतिक्षा यादीतील बालकाला संधी दिली जाणार आहे. राज्यात अद्याप एकाही बालकाचा प्रवेश झालेला नाही.