आठवडाभरात १०९ लोकांना कोरोना संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:17 AM2021-02-06T05:17:59+5:302021-02-06T05:17:59+5:30
वाशिम जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आणि कोरोना नियंत्रणासाठी ...
वाशिम जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आणि कोरोना नियंत्रणासाठी व्यापक उपाययोजना सुरू करण्यात आल्या. त्यानंतर मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात दुसरा रुग्ण आढळला नाही. तथापि, मे महिन्यापासून जिल्ह्यात हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या वाढली आणि जुलैपासून कोरोना संसर्गाने कमालीचा वेग घेतला. ऑगस्ट, सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आणि याच कालावधीत कोरोनाबळींची संख्या शंभरच्या वर पोहोचली. नोव्हेंबरच्या मध्यंतरापासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला. तथापि, नववर्षात जानेवारी महिन्यात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढल्याचे दिसले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येनेही ७ हजारांचा टप्पा ओलांडला. त्यात गेल्या आठवडाभरात अर्थात २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारीदरम्यानच जिल्ह्यात १०९ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. दरम्यान, याच कालावधीत ११९ रुग्णांनी कोरोनावर मात केली, ही बाब जिल्हावासीयांसाठी दिलासादायक ठरली आहे.
^^^^
आठवडाभरात दोन मृत्यू
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण दरदिवशी आढळून येत असतानाच गेल्या आठवडाभरात दोघांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यूही झाला आहे. त्यात ३१ जानेवारी रोजी एकाचा, तर ३ फेब्रुवारी रोजी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. एकीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या बाधितांच्या तुलनेत वाढली असतानाच आठवडाभरात कोरोनामुळे झालेले दोन मृत्यू ही बाबही निश्चितच चिंताजनक आहे.