वाशिम : कोरोनाचा एकही संशयित नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 11:35 AM2020-03-30T11:35:47+5:302020-03-30T11:36:21+5:30
५ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात, ६ जणांना घरीच विलगीकरण करून निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही संशयित अथवा बाधित रुग्ण आढळलेला नाही. परदेशातून परत आलेल्या ३२ व्यक्तींपैकी ५ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात, ६ जणांना घरीच विलगीकरण करून निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. मात्र त्यांच्यामध्ये सुद्धा कोणतेही लक्षणे आढलेली नाहीत. उर्वरित २१ व्यक्तींचा १४ दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाला असून त्यांच्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याने त्यांना विलगीकरणाच्या बाहेर करण्यात आले.
कोरोना विषाणू संसर्गाने संपूर्ण जग हादरले असून, खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिलपर्यंत ‘लॉक-डाऊन’चे निर्देश दिले आहेत. त्याची वाशिम जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू असून, सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत नागरिकांना जागरूक केले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३२ व्यक्ती परदेशातून परत आल्या आहेत. यापैकी ५ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात तर ६ जणांना घरीच विलगीकरण करून निगराणीखाली ठेवण्यात आले. उर्वरीत २१ जणांचा विलगीकरण कालावधी २८ मार्च रोजी पूर्ण झाला. कुणालाही कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत एकही संशयित अथवा बाधित रुग्ण आढळलेला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
अद्याप कोरोना विषाणूचा एकही रूग्ण आढळला नसला तरी संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने संचारबंदी आदेश, जिल्हा बंदी आदेशाची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. शेजारील काही जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला संशयित रुग्ण आढळत असल्याने यापासून सावध होत २८ मार्चला जिल्हा बंदचे आदेश दिले. पुढील आदेशापर्यंत कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही तसेच जिल्ह्यातील कोणताही व्यक्ती जिल्ह्याबाहेर जाणार नाही, या आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी २९ मार्चपासून सुरू केली आहे तसेच यापूर्वी संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तूंची विक्री २४ तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. परंतू, संभाव्य धोका टाळण्यासाठी २९ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरु केली जाणार आहे. रविवारी या आदेशाची अंमलबजावणी झाली.
दक्षता बाळगा
कोरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य धोक्यापासून सावधगिरी म्हणून प्रत्येक नागरिकानी स्वत:बरोबरच इतरांची काळजी घ्यावी, संचारबंदी आदेशाची अंमलबजावणी करावी, शक्यतोवर घराबाहेर पडू नये, स्वच्छता राखावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी केले.