अमानवाडी येथे एक कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:10 AM2021-01-08T06:10:01+5:302021-01-08T06:10:01+5:30
कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मेडशी : ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. किडींचा ...
कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
मेडशी : ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. किडींचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करावी, फवारणी करताना कोणती दक्षता घ्यावी, अधिकृत कृषी सेवा केंद्रातूनच कीटकनाशक खरेदी करावी, याबाबत तालुका कृषी विभागाने ४ जानेवारी रोजी मेडशी परिसरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
०००००
किन्हीराजा येथे दोन गटात थेट लढत
किन्हीराजा : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे ग्रामपंचायत निवडणूक होत असून, सत्ताधारी व विरोधक यांच्या पॅनलमध्ये थेट दुरंगी लढत होत आहे. ‘डोअर टु डोअर’ प्रचार सुरू झाल्याने राजकारण ढवळून निघत आहे. प्रचारासाठी सोशल मीडियाचा आधारही घेण्यात येत आहे. या निवडणुकीत बाजी कोण मारतो, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
०००००
मांगूळझनक येथे आरोग्य तपासणी
केनवड : येथून जवळच असलेल्या मांगूळझनक येथे ५ जानेवारी रोजी एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने गावात भेट देऊन संदिग्ध नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली.
०००००
संरक्षण भिंतीसाठी निधीची मागणी
रिठद : रिठद गावालगत पूरसंरक्षण भिंत उभारण्यासाठी शासनाकडून निधी मिळण्यासंदर्भात तालुका प्रशासनामार्फत यापूर्वी मागणी करण्यात आली. अद्याप शासनाकडून निधी मिळाला नाही. पूर संरक्षण भिंतीसाठी निधी देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायण आरू यांनी ६ जानेवारी रोजी तालुका प्रशासनाकडे केली.
०००००
चिखलीमार्गे रिसोड-अकोला बसफेरी बंद
रिसोड : चिखली, कवठा मार्गे सुरू असलेली रिसोड-अकोला ही बसफेरी बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. वाशिम मार्गे अकोला जाण्याची वेळ आली आहे. चिखलीमार्गे अकोला बसफेरी सुरू करण्याची मागणी कवठा येथील नंदकिशोर शर्मा यांनी बुधवारी केली.