वाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्ण दुपटीचा वेग २२८ दिवसांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 11:07 AM2021-02-25T11:07:46+5:302021-02-25T11:07:54+5:30
CoronaVirus In Washim रुग्ण दुपटीचा वेग (डबलिंग) ३२४ वरून २२८ दिवसांवर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गत आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, रुग्ण दुपटीचा वेग (डबलिंग) ३२४ वरून २२८ दिवसांवर आला आहे. ही बाब जिल्हावासीयांची चिंता वाढविणारी असून, आरोग्य विभागही सतर्क झाला आहे.
जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. त्यानंतर हळूहळू रुग्णसंख्येत वाढ होत गेली. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. या एका महिन्यात २६०० च्या वर कोरोनाबाधित आढळून आले तसेच ६० च्या आसपास रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सप्टेंबरनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत गेली. जानेवारी महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात गत आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येते. १७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या सात दिवसात जिल्ह्यात ५४९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे रुग्ण दुपटीचा वेग ३२४ दिवसांवरून २२८ दिवसांवर आला आहे. ही बाब जिल्हावासीयांची डोकेदुखी वाढविणारी ठरत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असून, त्याची अंमलबजावणी प्रभावी करण्यात यावी, अशा सूचना संबंधित सर्व यंत्रणांना दिलेल्या आहेत. नागरिकांनीदेखील प्रशासनाला सहकार्य करावे.
-शण्मुगराजन एस.,
जिल्हाधिकारी, वाशिम.
गत आठ दिवसापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सध्या कोरोना रुग्ण दुपटीचा वेग २२८ दिवसांवर गेला असून, यापूर्वी हा वेग ३२४ दिवस असा होता. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
- डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.