वाशिम जिल्ह्यात पुन्हा आढळला कोरोनाचा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 12:42 PM2020-06-03T12:42:48+5:302020-06-03T12:42:59+5:30
६० वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल ३ जून रोजी सकाळी पॉझिटिव्ह आला.
वाशिम : नवी मुंबई येथून मानोरा तालुक्यातील भोयणी येथे परतलेल्या एका ६० वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल ३ जून रोजी सकाळी पॉझिटिव्ह आला. यामुळे मानोरा तालुका प्रशासनासह आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून, भोयणी गाव सील करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली.
जिल्ह्यातील मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रुग्ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता. त्यानंतर उत्तरप्रदेशमधील कोरोनाबाधीत ट्रकच्या क्लिनरचा वाशिममध्ये मृत्यू झाला. त्याच ट्रकचा चालक कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले होते. मेडशी येथील एक रुग्ण व ट्रक चालकाने कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आले. त्यानंतर १५ मे रोजी मालेगाव येथील एक महिला कोरोनाबाधित असल्याचे आणि १९ मे रोजी या महिलेच्या संपर्कातील पाच जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. यापैकी एका रुग्णाचा २६ मे रोजी मृत्यू झाला तर उर्वरीत पाच रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. १९ मे पासून जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नव्हता. दरम्यान वाशी (नवी मुंबई) येथून मानोरा तालुक्यातील भोयणी येथे २८ मे च्या दरम्यान परतलेल्या एका ६० वर्षीय महिेलेला सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असल्याने मानोरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात दाखल करून १ जून रोजी तिचा थोट स्वॅब नमुना तपासणीसाठी अकोला येथे पाठविण्यात आला होता. याचा अहवाल ३ जून रोजी प्राप्त झाला असून, सदर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेसह मानोरा तालुका प्रशासन अलर्ट झाले. भोयणी येथे तहसिलदार डॉ. सुनील चव्हाण यांच्यासह पोलीस व आरोग्य यंत्रणेने भेट देऊन गाव सील करण्याची कार्यवाही सुरू केली. या महिलेच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.
कोरोनाबाधित रुग्णाचे गावात १४ दिवसांसाठी आरोग्य कर्मचाºयांमार्फत सर्वे केला जाणार आहे. त्या गावचा एरिया सील केला जाणार असून, ज्या ठिकाणी संबंधित रुग्ण वावरला, त्या ठिकाणी हायड्रोक्लोराईड सोल्यूशनची फवारणी केली जाणार आहे. संबंधित गावात कुणी येणार नाही तसेच गावातून कुणी बाहेर जाणार नाही, याची दक्षता घेतली जाणार, असे विश्वसनीय सूत्राने सांगितले.