वाशिम जिल्ह्यात लॉकडाऊनमध्येही वाढले कोरोनाचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 11:04 AM2020-07-20T11:04:34+5:302020-07-20T11:04:51+5:30
१५ जुलैपासून रिसोड व मंगरूळपीर येथे संपूर्ण लॉकडाऊन तर उर्वरीत चार शहरांमध्ये दुपारी २ वाजतानंतर लॉकडाऊन आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : लॉकडाऊन केल्यामुळे कोरोनाची साखळी तुटेल, असा दावा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असला तरी लॉकडाऊनच्या काळातही कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याचे दिसून येते. त्यामुळे लॉकडाऊन हा प्राथमिक पातळीवरील उपाय होता. तो आता फारसा प्रभावी व उपयुक्त ठरत नसल्याचे तथ्य समोर येत आहे. १५ जुलैपासून रिसोड व मंगरूळपीर येथे संपूर्ण लॉकडाऊन तर उर्वरीत चार शहरांमध्ये दुपारी २ वाजतानंतर लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या पाच दिवसात ८८ रुग्णांची भर पडली असून, जेथे संपूर्ण लॉकडाऊन आहे अशा रिसोड व मंगरूळपीर येथेच सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात जुलै महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३६६ वर पोहचली. कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून १५ जुलैपासून सात दिवसापर्यंत रिसोड व मंगरूळपीर येथे संपूर्ण लॉकडाऊन तर वाशिमसह उर्वरीत चार शहरांत दुपारी २ वाजतानंतर लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या पाच दिवसात ८८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. संपूर्ण लॉकडाऊन असलेल्या रिसोड येथे २६ तर मंगरूळपीर येथील जवळपास २४ जणांचा समावेश आहे.
आणखी १५ कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ३६६
१९ जुलै रोजी दिवसभरात १५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये मालेगाव तालुक्यातील इराळा येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली. ही व्यक्ती यापूर्वीच्या बाधिताच्या संपर्कातील आहे. रिसोड शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील ३ व गजानन महाराज मंदिर परिसरातील १, कारंजा लाड शहरातील साई नगर परिसरातील २ आणि वाशिम शहरातील फकीरपुरा परिसरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. सायंकाळी ७.३० वाजताच्या अहवालानुसार, मंगरुळपीर शहरातील काझीपुरा येथील ३, टेकडीपुरा येथील ३ व पठाणपुरा येथील १ व्यक्तीचा समावेश आहे. यापूर्वीच्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने या सर्वांना कोरोनाचा संसर्ग झाला.
मालेगाव येथील महिलेचा मृत्यू
रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये ११ जुलै रोजी मालेगाव येथील एक महिला पॉझिटिव्ह आढळली होती. उपचारादरम्यान १८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान जिल्हा कोविड रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. या महिलेला न्यूमोनिया होता, असे आरोग्य विभागाने १९ जुलै रोजी स्पष्ट केले.