संस्थात्मक विलगीकरणास कोरोना रुग्णांची ना; घरातच राहण्यावर भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 10:55 AM2021-05-31T10:55:21+5:302021-05-31T10:55:44+5:30

Corona Cases in Washim : अनेकजण अजूनही गृह विलगीकरणात राहण्याला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचे दिसून येते.

corona patients say no to Institutional isolation of ; Stay at home! | संस्थात्मक विलगीकरणास कोरोना रुग्णांची ना; घरातच राहण्यावर भर!

संस्थात्मक विलगीकरणास कोरोना रुग्णांची ना; घरातच राहण्यावर भर!

Next

- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कुटुंबातील इतर सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून ग्रामीण भागात सद्य:स्थितीत २३१ ठिकाणी संस्थात्मक विलगीकरणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. मात्र, संस्थात्मक विलगीकरणात राहण्यास बहुतांश रुग्णांची ना असून, अनेकजण अजूनही गृह विलगीकरणात राहण्याला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. संस्थात्मक विलगीकरणाचे फायदे सांगून समुपदेशन केल्यानंतरही रुग्ण गृह विलगीकरणातच असल्याने कर्मचाऱ्यांचे प्रयत्नही निष्फळ ठरत असल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ३ एप्रिल २०२० रोजी मेडशी (ता. मालेगाव) येथे आढळून आला होता. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत जनजीवन अधिक प्रमाणात प्रभावित झाले. मे महिन्याच्या अखेरीस दुसरी लाट ओसरत असल्याचे तूर्तास दिसून येत आहे. 
गत एका महिन्यापासून शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. अनेकांकडे स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने कोरोनाबाधित रुग्ण व कुटुंबातील अन्य सदस्यांकडून एकच शौचालय व स्वच्छतागृहाचा वापर होतो. त्यामुळे कुटुंबातील अन्य सदस्यांनादेखील संसर्ग होत असल्याचे समोर आल्याने यापुढे अपवादात्मक परिस्थिती वगळता कोरोनाबाधितांना गृह विलगीकरणात राहता येणार नाही, असे निर्देश शासन, प्रशासनाने दिलेले आहेत. 
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश आरोग्य विभाग, ग्रामपंचायतींना दिलेले आहेत. त्यानुसार शासकीय, निमशासकीय इमारती, जिल्हा परिषद शाळेच्या इमारती अधिग्रहित करण्यात येत असून, तेथे संस्थात्मक विलगीकरणाची सुविधा उपलब्ध केली जात आहे. आतापर्यंत २३१ ठिकाणी संस्थात्मक विलगीकरणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. दुसरीकडे, संस्थात्मक विलगीकरणात राहण्यास रुग्णांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. सध्या जिल्ह्यात २४३७ सक्रिय रुग्ण यांपैकी ३३७ रुग्ण हे रुग्णालयांत दाखल आहे, तर ४४० च्या आसपास रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. उर्वरित १,६६० रुग्ण हे गृह विलगीकरणातच असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.


जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या २३१ ठिकाणी संस्थात्मक विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आपल्यापासून कुटुंबातील अन्य सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून कोरोना रुग्णांनी संस्थात्मक विलगीकरणात राहावे, याबाबत स्थानिक कर्मचारी, आरोग्य विभागातर्फे समुपदेशनही केले जात आहे.
-डॉ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

Web Title: corona patients say no to Institutional isolation of ; Stay at home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.