कोरोनाचा वाशिममध्ये शिरकाव; दिल्लीच्या कार्यक्रमातील सहभागीचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 04:09 PM2020-04-03T16:09:21+5:302020-04-03T18:38:21+5:30
वाशिम जिल्ह्यातही एकाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले आहे.
वाशिम: महाराष्टात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना वाशिम जिल्ह्यातही एकाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाने तपासणीसाठी पाठविलेल्या या व्यक्तीच्या ‘थ्रोट स्वॅब’चा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून, जिल्हा प्रशासनाने याची पुष्टी दिली आहे. दोन आठवड्यांपूर्वी दिल्ली येथील धार्मिक संमेलनात हा व्यक्ती सहभागी झाल्याची माहिती आहे. दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीत एक धार्मिक संमेलन झाले होते. या संमेलनात दोन हजारांपेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते. या संमेलनात महाराष्ट्रातील १०९ भाविकांचा सहभाग होता. दरम्यान वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक जण या संमेलनात हजेरी लावून परत आल्याचा संशय जिल्हा प्रशासनाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित संशयितास विचारणा केली असता, त्या संमेलनात आपण गेलो नसल्याचे तो इसम सांगत होता. तथापि, खबरदारी म्हणून त्या व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आणि त्याचे ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. शुक्रवार ३ एप्रिल रोजी त्याच्या ‘थ्रोट स्वॅब’चा अहवाल प्राप्त झाला. त्यात त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे, ही माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.