कोरोनाविषयक निर्बंध शिथिल; जि.प. पोटनिवडणुकीकडे लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2021 11:30 AM2021-08-08T11:30:03+5:302021-08-08T11:30:13+5:30

Washim ZP by-elections : संभाव्य तिसरी लाट येण्यापूर्वी पोटनिवडणूक होणार की आणखी लांबणीवर पडणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

Corona restriction relaxed; Attention towards Washim Z.P. by-elections! | कोरोनाविषयक निर्बंध शिथिल; जि.प. पोटनिवडणुकीकडे लक्ष!

कोरोनाविषयक निर्बंध शिथिल; जि.प. पोटनिवडणुकीकडे लक्ष!

Next

- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :   कोरोना नियंत्रणात असल्याने जिल्ह्यातील निर्बंध ब-याच अंशी शिथिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीची ९ जुलै रोजी स्थगित केलेली प्रक्रिया पुन्हा सुरू होणार की आणखी लांबणीवर पडणार, याकडे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे. 
७ जानेवारी २०२० रोजी वाशिम जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी निवडणूक झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी राज्य निवडणूक आयोगाने २२ जून २०२१ रोजी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित केला. उमेदवारी अर्ज दाखल करणे, उमेदवारी अर्जाची छाननी व वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे आदी प्रक्रिया पार पडलेली आहे. दरम्यान, कोरोनाविषयक परिस्थिती लक्षात घेऊन पोटनिवडणुकीबाबत निर्णय घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला ६ जुलै रोजी दिला होता. त्याअनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने जिल्हास्तरीय अहवालावरून, पोटनिवडणूक कार्यक्रम आहे त्या स्थितीस अनुसरून ९ जुलै रोजी स्थगित केला. दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यातील निर्बंध राज्य शासनाने आणखी शिथिल केले. यामध्ये वाशिम जिल्ह्याचादेखील समावेश आहे. निर्बंध शिथिल झाल्याने तसेच उपचाराखाली केवळ दोन रुग्ण असल्याने जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याचे तूर्तास तरी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर स्थगित झालेली पोटनिवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरू केव्हा होणार, या प्रतीक्षेत इच्छुक उमेदवार असल्याचे दिसून येते. संभाव्य तिसरी लाट येण्यापूर्वी पोटनिवडणूक होणार की आणखी लांबणीवर पडणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

इच्छुक उमेदवार सर्कलमध्ये तळ ठोकून!
कोरोना नियंत्रणात असल्याने आणि निर्बंध शिथिल होत असल्याने पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमावरील स्थगिती कोणत्याही क्षणी उठविली जावू शकते, ही शक्यता लक्षात घेता इच्छूक उमेदवार पुन्हा एकदा आपापल्या सर्कलमध्ये सक्रिय झाल्याचे दिसून येते. सर्कलमधील प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्ते, खंदे समर्थकांकडून आढावा घेत अधिकाधिक वेळ सर्कलमध्ये देण्यावर भर दिला जात आहे. सर्कलमधील समस्या सोडविण्यासाठी आपली उमेदवारी कशी सक्षम आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न इच्छूकांकडून होत आहे.

Web Title: Corona restriction relaxed; Attention towards Washim Z.P. by-elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.