ग्रामीण भागातही कोरोनाची धास्ती; महामंडळाच्या बसमध्ये प्रवाशी बसेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 12:13 PM2020-07-10T12:13:10+5:302020-07-10T12:13:18+5:30
रिसोड ते मालेगाव या मार्गावरील बसफेऱ्यांमध्ये फारसे प्रवाशी नसल्याचे गत तीन दिवसात दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होत असल्याने महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करण्यास प्रवाशी फारसे धजावत नसल्याचे ७ ते ९ जुलैदरम्यान शिरपूरमार्गे रिसोड ते मालेगाव या दरम्यानच्या बसफेऱ्यांमध्ये दिसून आले. मालेगाव व रिसोड बसस्थानकात शुकशुकाटही दिसून आला.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य शासनाने २१ मार्चपासून लालपरीचा चक्काजाम केला होता. दरम्यान, वाशिम जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये असल्याने ८ मे पासून काही अटी व शर्तीवर जिल्हा ते तालुका अशी बससेवा सुरू केली होती. त्यावरही काही बंधने आली. त्यानंतर राज्यात रेड झोन आणि नॉन रेड झोन असे दोन झोन पाडून, २२ मे पासून ‘नॉन रेड झोन’मध्ये बºयापैकी शिथिलता मिळून जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू झाली. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय झाली. दुसरीकडे जून महिन्यातच जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमालिची वाढली. जुलै महिन्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकदेखील सावधगिरीचे पाऊल टाकत असल्याचे दिसून येते. मालेगाव व रिसोड शहरासह तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सध्या मालेगावात पाच तर रिसोड शहरात कोरोनाचा एक रुग्ण आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रिसोड ते मालेगाव या मार्गावरील बसफेऱ्यांमध्ये फारसे प्रवाशी नसल्याचे गत तीन दिवसात दिसून आले. केवळ तीन ते चार प्रवाशी घेऊन या बसेस तोट्यात धावत असल्याचे दिसून येते.
(वार्ताहर)