ग्रामीण भागात कोरोना सुसाट; प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:39 AM2021-04-15T04:39:45+5:302021-04-15T04:39:45+5:30
वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, ग्रामीण भागातही कोरोना सुसाट असल्याचे दिसून येते. दरम्यान, योग्य ...
वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, ग्रामीण भागातही कोरोना सुसाट असल्याचे दिसून येते. दरम्यान, योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याने ग्रामीण भागात अधिक संख्येने रुग्ण आढळून येत आहे.
जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून कोरोनाने ग्रामीण भागही व्यापून टाकला आहे. जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. त्यानंतर कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत गेला. मात्र, हा दिलासाही अल्पकाळासाठी ठरला. यंदा फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आणि त्यातही ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण अधिक संख्येने आढळून येत असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. रिसोड तालुक्यातील गोवर्धनसारख्या खेडेगावात बुधवारी तब्बल २१० कोरोनाबाधित रुग्ण आढळुून आले. ग्रामीण भागात कोरोना सुसाट असतानाही अनेक ठिकाणी ‘ना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, ना आयसोलेशन’ अशी परिस्थिती आहे. ग्रामीण भागात अजूनही कोरोनाविषयक सुरक्षिततेचे नियम गांभीर्याने पाळले जात नसल्याचे दिसून येते. काही ठिकाणी आरोग्य विभागाची चमू या गृहविलगीकरणातील रुग्णांची ऑक्सिजन पातळी आणि तापमानाची नोंद घेत आहे तर काही ठिकाणी रुग्णाकडे ऑक्सिजन पातळी व तापमानाची नोंद घेण्याची सुविधा नसल्याचीही माहिती आहे. प्रतिबंधित क्षेत्रात आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण केले जात आहे.
००००
ग्रामस्तरीय समितीचा वॉच
गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांवर वॉच ठेवण्याची जबाबदारी ग्रामस्तरीय समितीवर सोपविण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी ग्रामस्तरीय समिती गृहविलगीकरणातील रुग्णांवर गांभीर्याने वॉच ठेवत नसल्याची परिस्थिती आहे.
काही ठिकाणी ७ ते ९ दिवसानंतरच काही रुग्ण गृहविलगीकरणातून बाहेर पडत असल्याची माहिती आहे. १४ ते १७ दिवस गृह विलगीकरणातच राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत. मात्र, या सूचनांकडे अनेकजण दुर्लक्ष करतात.
००००
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग संथ
कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या संपर्कातील किमान १५ ते २० संदिग्धांची चाचणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
तथापि, काही ठिकाणी संपर्कातील १५ ते २० जणांची चाचणी होत नसल्याचे दिसून येते. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा मुद्दा गांभीर्याने घेणे गरजेचे ठरत आहे.
00
कोट बॉक्स
ग्रामीण भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्यवस्थित केले जात आहे तसेच गृह विलगीकरणातील रुग्णांवर ग्रामस्तरीय समिती, आरोग्य कर्मचाऱ्यांचा वॉच असतो. रुग्ण व नातेवाईकांनीदेखील योग्य ती काळजी घ्यावी.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी वाशिम
०००
जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २०२२१
ग्रामीण भागातील रुग्णसंख्या ८३००
गृहविलगिकरणात असलेले रुग्ण ४००