कोरोनाने शिकविले कॉस्ट कटिंग; किचनपासून कटिंगपर्यंत खर्चकपात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:27 AM2021-07-11T04:27:38+5:302021-07-11T04:27:38+5:30
कोरोना काळात शासनस्तरावर लाॅकडाऊन, कडक निर्बंध लागू करण्यात आले. यामुळे बाजारपेठेतील सर्वच दुकाने अनेक दिवस बंद राहिली. विविध कंपन्या, ...
कोरोना काळात शासनस्तरावर लाॅकडाऊन, कडक निर्बंध लागू करण्यात आले. यामुळे बाजारपेठेतील सर्वच दुकाने अनेक दिवस बंद राहिली. विविध कंपन्या, कारखान्यांचा कारभारही या काळात विस्कळीत झाला. यामुळे व्यावसायिक, उद्योजकच अडचणीत सापडल्याने त्यांच्याकडे काम करीत असलेल्या अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. विशेषत: खासगी क्षेत्रात कार्यरत अनेक कर्मचाऱ्यांचे पगार कमी करण्यात आले. बाजारपेठेत छोटी दुकाने थाटून पोट भरणाऱ्यांवरही आर्थिक संकट कोसळले. त्यामुळे गृहिणींनी काटकसरीचा पर्याय स्वीकारून विविध खर्चांमध्ये स्वत:च कपात करून घेतली.
.....................
कुठे कुठे केले कॉस्ट कटिंग
विद्युत उपकरणांचा वापर कमी केला
हाॅटेलमध्ये जेवण करणे टाळले
बाहेर फिरायला जाण्यावर निर्बंध आणले
दुकानांऐवजी दाढी घरातच केली.
महिलांनी ब्युटीपार्लरमध्ये जाणे टाळले
मुलांची खेळणी विकत आणणे थांबविले
.................
१) आर्थिक अडचणीचा काळ असल्याने अनेकांनी घरातील विद्युत उपकरणांचा वापर कमी केला. यामुळे विद्युत देयकांत बचत झाली.
२) कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे पगार कपात झाले. यामुळे हाॅटेलिंगवर होणारा अवास्तव खर्च टाळून घरातच वेगवेगळ्या भाज्या करण्यावर गृहिणींनी भर दिला.
३) पुरुषांनी कटिंग आणि दाढी करण्यासाठी दुकानांमध्ये न जाता घरातच राहून ओबडधोबड का होईना केस कटिंग करून घेतले. अनेकांनी या काळात स्वत:च्या हाताने दाढी करणे शिकून घेतले.
.....................
हाॅटेलिंग थांबविल्याने दोन हजार वाचले...
कोरोना काळात विशेषत: हाॅटेलमध्ये जाऊन जेवण करणे थांबविले. यामुळे महिन्याकाठी होणारा दोन हजारांचा खर्च वाचला. हाच पैसा इतर कामांमध्ये खर्च करता आला, अशी प्रतिक्रिया प्रदीप इढोळे कुटुंबियाने व्यक्त केली.
......................
मुलांच्या डोक्याचे केस घरीच कापले...
कुटुंबातील मुलांच्या डोक्यावरचे केस कापण्यासाठी किमान १०० रुपये खर्च होतो. कोरोना काळात काही दिवस सलूनची दुकाने बंद राहिली. त्यावेळी मुलांच्या डोक्याचे केस घरीच कापले, असे मुळे कुटुंबियांनी सांगितले.
...................
बाहेर फिरायला जाण्यावर आणले निर्बंध...
कोरोना संकट काळापूर्वी दरवर्षी कुटुंबाला घेऊन बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखण्यात यायचा; मात्र मध्यंतरीचा काळ आर्थिक अडचणीचा गेला. त्यामुळे बाहेर फिरायला जाण्यावर निर्बंध आणले, अशी प्रतिक्रिया डाखोरे कुटुंबियाने दिली.