ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांत होणार कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 03:57 PM2021-02-16T15:57:17+5:302021-02-16T15:57:23+5:30
Washim News जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना चाचणीसाठी घशातील स्त्राव नमुने संकलित केले जाणार आहेत.
वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी कोरोना बाधितांचा लवकर शोध घेवून त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी घेतला असून जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना चाचणीसाठी घशातील स्त्राव नमुने संकलित केले जाणार आहेत.
कोरोनाविषयक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी आरोग्य यंत्रणेची बैठक घेतली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत झालेली वाढ पाहता सर्वांनी आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना बाधित रुग्णांचा शोध घेवून त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार सुरु झाल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता अधिक असते. याउलट अशा रुग्णाचे निदान होण्यास विलंब झाल्यास या बाधितांपासून त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना व इतर नागरिकांना संसर्ग होवून कोरोनाचा फैलाव होवू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना संसर्गाची लक्षणे दिसताच त्वरित नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालयात जावून कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले.