कोरोना नियंत्रणात, तरी परराज्यातील एकमेव फेरी बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:26 AM2021-07-09T04:26:40+5:302021-07-09T04:26:40+5:30
कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर एसटी प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील चारही आगारांतून मुख्य मार्गावर ...
कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर एसटी प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील चारही आगारांतून मुख्य मार्गावर बसफेऱ्या सोडण्यात येत आहेत. परंतु, बसगाड्यांची कमतरता आणि ग्रामीण भागांतून मिळणाऱ्या अल्प प्रतिसादामुळे निम्म्याहून अधिक नियतेच बंद आहेत. मंगरुळपीर, कारंजा, रिसोड आणि वाशिम या सर्वच आगारांची स्थिती सारखीच आहे. त्यात वाशिम येथून आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथे जाणारी बसफेरीही अद्याप सुरू झालेली नाही. परराज्यात प्रवासी वाहतूक सुरू करण्याबाबतचे आदेश वाशिम आगार प्रमुखांना विभागस्तरावरून मिळालेले नाहीत. त्यामुळे ही बसफेरी गेल्या वर्षभरापासून बंद असल्याने या बसचा आधार असलेल्या प्रवाशांची समस्या कायमच आहे.
============
१) जिल्ह्यातील एकूण आगार - ०४
एकूण बसेस - १८६
सध्या सुरू असलेल्या बसेस - १२२
रोज एकूण फेऱ्या - १०१
दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या बसेस - ००
२) पुन्हा तोटा वाढला
शासनाने कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवर नियंत्रणासाठी गत १५ दिवसांपासून काही निर्बंध नव्याने लागू केले आहेत. याअंतर्गत वाशिम जिल्ह्यात व्यावसायिक प्रतिष्ठान यांना सायंकाळी ४ वाजेपर्यंतचीच परवानगी आहे, तर शनिवार, रविवार जीवनावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय, उद्योग बंदच ठेवण्याचे आदेश आहेत. त्याचा एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाल्याने एसटीचा तोटा पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे.
-----------------------
३) दुसऱ्या राज्यासाठी बसच नाही !
वाशिम जिल्ह्यातील चार आगारांपैकी केवळ वाशिम येथील आगारातून परराज्यासाठी एकमेव बस सोडली जाते. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावापूर्वी ही बसफेरी नियमित सोडली जात होती. परंतु, गतवर्षी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने एसटीची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. त्याच वेळी वाशिम आगारातून आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथे सोडण्यात येणारी बसफेरी बंद करण्यात आली. ती अद्यापही सुरू करण्यात आली नाही.
------------------
४) अनेक मार्गावरील फेऱ्या बंदच
जिल्ह्यातून परजिल्ह्यात जाणाऱ्या जवळपास सर्वच बसफेऱ्या सुरू आहेत. काही लांब पल्ल्याच्या फेऱ्यांचे अंतर मात्र कमी करून सोडण्यात येत आहेत. त्यात औरंगाबाद, पुणे, जळगाव या मार्गावरील एक-दोन बसफेऱ्या बंद आहेत. या मार्गावर प्रवाशांची संख्याही कमी असल्याने आगार व्यवस्थापकांना काही फेऱ्यांचे नियोजन करावे लागत आहे. जिल्ह्यातील चारही आगारांतील काही फेऱ्या प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी स्थगित कराव्या लागत आहेत.
---------------
५) नागपूर मार्गावर गर्दीच गर्दी
जिल्ह्यातील सर्वच प्रमुख मार्गावर एसटीच्या बसेस नियमित धावत आहेत. प्रत्येक मार्गावर प्रवाशांचा कमीअधिक प्रतिसाद मिळत असल्याने प्रतिसाद पाहूनच आगार व्यवस्थापकांना फेऱ्यांचे नियोजन करावे लागते. तथापि, जिल्ह्यातील अमरावती, यवतमाळमार्गे नागपूरकडे जाणाऱ्या बसफेऱ्यांना अधिक प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या बसफेऱ्यांत प्रवाशांची गर्दीच गर्दी दिसत आहे.