शहरी भागात कोरोना ठाण मांडून; चार दिवसात ११६ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 12:44 PM2020-08-05T12:44:48+5:302020-08-05T12:45:08+5:30
यापैकी ११६ रुग्ण हे शहरी भागातील तर ७४ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आॅगस्ट महिन्यात चार दिवसात तब्बल १९० रुग्णांची भर पडली. दरम्यान यापैकी ११६ रुग्ण हे शहरी भागातील तर ७४ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली ७८५ पैकी ४८८ रुग्ण हे शहरी भागात आढळून आले आहेत. त्यामुळे शहरवासियांची चिंता वाढली असून, वाशिम व कारंजा या दोन शहरात सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत आॅगस्ट महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. १ ते ४ आॅगस्ट या चार दिवसात १९० रुग्ण वाढले आहेत. १ आॅगस्ट रोजी २६, २ आॅगस्ट रोजी ४१, ३ आॅगस्ट रोजी ९१ आणि ४ आॅगस्ट रोजी ३२ असे एकूण १९० रुग्णांची भर पडल्याने आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८५ वर पोहचली आहे. या चार दिवसात ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. १ आॅगस्ट रोजी शहरी भागात २१ तर ग्रामीण भागात ५, २ आॅगस्ट रोजी शहरी भागात ३३ तर ग्रामीण भागात ८, ३ आॅगस्ट रोजी शहरी भागात ५४ तर ग्रामीण भागात ३७ आणि ४ आॅगस्ट रोजी शहरी भागात ८ तर ग्रामीण भागात २४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.
१ एप्रिल ते ४ आॅगस्ट या दरम्यान जिल्ह्यात एकूण ७८५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, यामध्ये शहरी भागातील ४८८ तर ग्रामीण भागातील २९७ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ४५९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर एकूण १८ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ३०८ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
४५९ जणांची कोरोनावर मात
एकिकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाºयांची संख्याही वाढत आहे. ७८५ रुग्णांपैकी आतापर्यंत ४५९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. ३०८ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू आहेत.