गरोदर महिलांनाही घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:50 AM2021-07-07T04:50:59+5:302021-07-07T04:50:59+5:30
वाशिम : गरोदर महिलांनाही कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी, अशी सूचना आरोग्य मंत्रालयाने दिली असून, लसीकरण गरोदर महिलांसाठी उपयोगाचं ...
वाशिम : गरोदर महिलांनाही कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी, अशी सूचना आरोग्य मंत्रालयाने दिली असून, लसीकरण गरोदर महिलांसाठी उपयोगाचं असून, त्यांनाही लस देण्यात यावी, असे आवाहनही केले. त्यानुसार जिल्ह्यातील गरोदर मातांनीदेखील लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर भर देण्यात येत आहे; परंतु अजूनही काही गैरसमज, अफवा असल्याने सर्वच घटकांचा लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, याबाबत आरोग्य विभागातर्फे जनजागृती केली जात आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीबाबत व्यापक जनजागृती सुरू असून, गरोदर मातांनीदेखील लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले. प्रत्येक औषधांचे आणि लसींचे जसे इतरांना छोटे परिणाम जाणवतात तसेच गरोदर मातांनाही जाणवतील. हात दुखणे किंवा अंगदुखी, हलकासा ताप यांसारखी लक्षणे जाणवू शकतील. क्वचित काही मातांना २० दिवसांपर्यंत ही छोटी लक्षणे जाणवू शकतील. अशा महिलांनी घाबरून न जाता तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता गरोदर मातांनी लस घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले.
००००००००००००००
गरोदर महिलांनी लस घेण्यापूर्वी ...
कोरोना विषाणूचा धोका गर्भवती महिलांना आहे. कारण गर्भवती अवस्थेत स्त्रियांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीविरुद्ध लढायची कमी क्षमता असते. म्हणूनच गर्भवती महिलांनी काळजी घेणे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे.
लस घेण्यापूर्वी आवश्यक त्या नियमित चाचण्या कराव्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी. लस घेतल्यानंतर विश्रांती घ्यावी.
कोरोनाकाळात गर्भवती महिलांनी काळजी करण्याची ही वेळ आहे. त्यामुळे अशा महिलांनी अजिबात ताणतणाव घेणे टाळावे. आरामात राहावे, जेणेकरून मन शांत राहील. गर्भधारणा शेवटच्या टप्प्यावर असेल तर डॉक्टरांकडून नियमित तपासणी करावी.
०००००००००००००००००
कोट
कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर भर देण्यात येत आहे. आवश्यक ती काळजी घेऊन गर्भवती महिलांनादेखील कोरोना प्रतिबंधक लस घेता येते. कोणताही गैरसमज, अफवांवर विश्वास न ठेवता गर्भवती महिलांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम
००००००
कोट
कोरोनाकाळात गर्भवती महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गर्भवती महिलांनादेखील कोरोना प्रतिबंधक लस घेता येते. लसीकरणानंतर काही लक्षणे जाणवत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. नेहा परळकर
स्त्री रोग तज्ज्ञ.
००००