Corona Vaccine : अखेर ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 11:57 AM2021-06-20T11:57:46+5:302021-06-20T11:58:04+5:30
Corona Vaccine: प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या नियमानुसार ‘ऑन स्पॉट’ नोंदणीची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सव्वा महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना १९ जूनपासून जिल्ह्यातील ३३ केंद्रांत कोरोना प्रतिबंधक लस देण्याला सुरुवात झाली आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या नियमानुसार ‘ऑन स्पॉट’ नोंदणीची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
जिल्ह्यात पहिल्या लाटेत ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे या महिन्यात जनजीवन प्रभावित झाले होते. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे लसीकरणावरही भर देण्यात आला. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्स, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील आणि १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याला सुरुवात झाली. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला जेमतेम १० दिवस होत नाहीत, तोच लसींचा तुटवडा असल्याचे कारण समोर करून शासनस्तरावरून या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात आले. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत जिल्ह्यात ३२ हजार ९१९ कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये सर्वाधिक १९ हजारांवर रुग्ण हे १८ ते ४५ वयोगटातील आहेत. कोरोनावर लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याचे सांगण्यात येत आहे. सव्वा महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसी करणाला जिल्ह्यात १९ जूनपासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील एकूण ३३ केंद्रांत हे लसीकरण करण्यात येत असून, या सर्व केंद्रांत ३० ते ४४ वयोगटातील लाभार्थी ‘ऑन स्पॉट’ नोंदणी करून लस घेऊ शकतात. प्रथम येणाऱ्या लाभार्थीस प्राधान्य राहील, तसेच केंद्रावर उपलब्ध असलेल्या लसीच्या डोसनुसार लसीकरण करण्यात येईल. ३० ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थींना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जात आहे.
१९ जूनपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. लसीकरण हा कोरोनावर प्रभावी उपाय आहे. लस ही पूर्णत: सुरक्षित असून प्रत्येक नागरिकांने कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता लस घ्यावी. एकाच प्रकारच्या लसीचा हट्ट न धरता उपलब्ध लस घ्यावी.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी