पहिल्यादिवशी ३०० फ्रंटलाईन वर्कर्संना दिली कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:35 AM2021-01-17T04:35:43+5:302021-01-17T04:35:43+5:30
कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करणाऱ्या कोविशिल्ड लसीचे ६५०० डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय व खासगी ...
कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करणाऱ्या कोविशिल्ड लसीचे ६५०० डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. १६ जानेवारी रोजी जिल्ह्यात तीन केंद्रांत लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला असून, जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे आमदार लखन मलिक, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती. वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा उपजिल्हा रुग्णालय आणि मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालय या तीन ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात आली असून, प्रत्येक ठिकाणी १०० अशा एकूण ३०० आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. या सर्वांना मोबाईलवर संदेश पाठवून लसीकरण मोहिमेला उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे.
०००००
कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करणाऱ्या लसीचे ६५०० डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. १६ जानेवारी रोजी वाशिम, कारंजा व मंगरूळपीर अशा तीन केंद्रांत लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.
-शण्मुगराजन एस.,
जिल्हाधिकारी, वाशिम
०००
लसीच्या पहिल्या मानकरी पूनम सराफ
कोरोना लसीकरणाची प्रतीक्षा संपली असून, पहिल्यादिवशी वाशिम येथे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कर्मचारी पूनम सराफ यांना लस देऊन मोहिमेला सुरुवात झाली. लसीच्या पहिल्या मानकरी ठरलेल्या सराफ यांच्यानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाशिम येथे एकूण ९९ जणांना लस देण्यात आली. एकूण ५८३८ जणांना कोरोना लस देण्यात येणार आहे.
००
कोविन ॲपवर पडताळणी
लसीकरणासाठी नोंदणी केलेल्यांना मोबाईलवर संदेश पाठवून उपस्थित राहण्याबाबत सूचना दिल्या होत्या. वाशिम, कारंजा व मंगरूळपीर या तीन केंद्रांत लसीकरणासाठी आल्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स यांची ओळख पटविणे, ‘कोविन’ ॲपवर नावाची पडताळणी केल्यानंतर लस देण्यात आली. ही लस दिल्यानंतर त्यांना ३० मिनिटे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. या लसीकरणामुळे पहिल्या दिवशी कुणाला काही त्रास जाणवल्याचे दिसून आले नाही. पहिल्या टप्प्यात ५८३८ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.