Corona Vaccine : १८ वर्षांवरील युवकांच्या लसीकरणाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 05:01 PM2021-06-23T17:01:08+5:302021-06-23T17:01:24+5:30
Corona Vaccine : पहिला डोस कोविशील्ड चा दिला जाणार आहे.
वाशिम : कोरोना प्रतिबंधक लसीची प्रतीक्षा संपुष्टात आली असून, २२ जूनपासून १८ वर्षांवरील युवकांना देखील लस दिली जात आहे. पहिल्या डोससाठी कोविशिल्ड तर दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिन ही लस राखीव करण्यात आली आहे.
जिल्ह्यात पहिल्या लाटेत ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे या महिन्यात जनजीवन प्रभावित झाले होते. एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे लसीकरणावर ही भर देण्यात आला. जिल्ह्यात १६ जानेवारी पासून फ्रंटलाइन वर्कर्स, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील आणि १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याला सुरुवात झाली. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला जेमतेम १० दिवस होत नाहीत, तोच लसींचा तुटवडा असल्याचे कारण समोर करून शासन स्तरावरून या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविले होते. सव्वा महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला जिल्ह्यात १९ जूनपासून प्रारंभ झाला. १८ ते ३० या वयोगटातील युवकांचे लसीकरण मात्र बंदच होते. अखेर २२ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू करण्यात आले. १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना फक्त कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जात आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
येथे मिळणार लस
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय कारंजा, जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिम येथे लसीकरण केंद्राची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पात्र नागरिकांनी नजीकच्या केंद्रात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस घ्यावा !
दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिन लस राखीव ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या १२ हजार डोस उपलब्ध आहेत. पहिला डोस घेऊन विहित कालावधी पूर्ण असलेल्या नागरिकांनी तातडीने लसीचा दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
जिल्ह्यात २२ जूनपासून १८ वर्षांवरील नागरिकांना देखील कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. सर्व पात्र नागरिकांनी नजीकच्या केंद्रात जाऊन लस घ्यावी. लस ही पूर्णतः सुरक्षित असून, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी वाशिम