Corona Vaccine in Washim : दोन दिवसात केवळ ७०० युवकांना मिळाली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 10:58 AM2021-05-04T10:58:34+5:302021-05-04T10:58:40+5:30
Corona Vaccine in Washim: १३० पैकी १२५ केंद्रे बंद असून, पाच केंद्रांत लसीकरण सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : १८ वर्षांवरील नागरिकांना १ मे पासून कोरोना प्रतिबंधक लस दिली जात असून, जिल्ह्यात लसींचा तुटवडा असल्याने गत दोन दिवसांत केवळ ७०० युवकांना लस देण्यात आली. १३० पैकी १२५ केंद्रे बंद असून, पाच केंद्रांत लसीकरण सुरू आहे. येत्या दोन दिवसांत लसींचा साठा उपलब्ध होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच लस दिली जात आहे. या गटातील लाभार्थींची संख्या मोठी असल्याने त्या तुलनेत लसीची मागणीही वाढली आहे. मात्र, सद्य:स्थितीत जिल्ह्यात लसीचा पुरेसा साठा नसल्याने जिल्ह्यातील केवळ कारंजा, मानोरा, मालेगाव, रिसोड व वाशिम अशा पाच केंद्रांत सध्या लसीकरण सुरू आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना लसीकरणाचा मोठा आधार आहे. मागील चार महिन्यांत आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षांवरील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. लसीकरणाला लाभार्थींचा प्रतिसादही मिळत आहे; परंतु गरजेनुसार लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहीम अधूनमधून प्रभावित होत आहे. जिल्ह्यात १३० लसीकरण केंद्रे आहेत. मात्र, लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना पहिल्या दिवशी १ मे रोजी २०६ आणि २ मे रोजी ४६६, असा एकूण ६७२ जणांना लस देण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी लस घेण्यासाठी गर्दी झाल्याचे दिसून आले.
लसीचे डोस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने अनेकांना लस घेता आली नाही. त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूरही उमटला. जिल्ह्यात ४५ वर्षांवरील व्यक्तींची अंदाजे संख्या ३.५० लाखांच्या आसपास असून, २ मे पर्यंत यापैकी १.२४ लाख जणांना लस मिळाली आहे.
सद्य:स्थितीत लसींचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध नसला, तरी लवकरच साठा प्राप्त होणार असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यात १३० केंद्रांवर लसीकरण केले जात असून, लसींचे डोस प्राप्त होत आहेत. १ मे पासून १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येत आहे. लसीची मागणी नोंदविण्यात आली असून, त्यानुसार दोन, तीन दिवसाआड लसींचा पुरवठा होतो. आणखी एक, दोन दिवसांत लसींचा साठा जिल्ह्याला प्राप्त होणार आहे. १८ ते ४५ वर्षे वयोगटातील ६७२ जणांना दोन दिवसांत लस देण्यात आली आहे.
- डॉ. मधुकर राठोड
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम