आता रात्री नऊपर्यंत मिळणार कोरोनाची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 11:08 AM2021-07-05T11:08:46+5:302021-07-05T11:08:51+5:30
Corona Vaccination : विशेष म्हणजे रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांसाठी कोरोनाची लस उपलब्ध असणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेस गती मिळावी, यासाठी आता दोन पाळीत लसीकरण केले जाणार आहे. विशेष म्हणजे रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांसाठी कोरोनाची लस उपलब्ध असणार आहे. त्यासाठी कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्हीही लसींचे डोस पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८३ हजार ८०२ पुरुष आणि १ लाख ६१ हजार २७३ महिला अशा एकूण ३ लाख ४५ हजार ७५ जणांचे लसीकरण झालेले आहे. त्यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या २ लाख ६४ हजार ३५४; तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ८० हजार ७२१ इतकी आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून लसीकरण मोहिमेस गती मिळावी, यासाठी आरोग्य विभागाचे युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता यापुढे दोन पाळीत लसीकरण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. त्यानुषंगाने सकाळी ९ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री ९ वाजता अशा वेळा निश्चित करण्यात आल्या आहे. यासाठी नियोजन करून आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात येणार आहे.
शेतकरी, शेतमजुरांच्या लसीकरणावर भर
सध्या खरीप हंगाम सुरू असून ग्रामीण भागातील बहुतांश लोक दिवसभर शेतामध्ये कामात व्यस्त असतात. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत लसीकरण शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. यामाध्यमातून विशेषत: शेतकरी व शेतमजुरांच्या लसीकरणावर भर दिला जाणार आहे.
जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत २ लाख ६४ हजार ३५४ जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे; तर ८० हजार ७२१ जणांनी दुसरा डोस घेऊन स्वत:ला सुरक्षित केले आहे. १ लाख ८३ हजार ६३३ जणांना लसीचा दुसरा डोस द्यावा लागणार आहे. त्याचे नियोजन करण्यात आले. नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन लसीकरण करून घ्यावे.
- डाॅ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम