आता रात्री नऊपर्यंत मिळणार कोरोनाची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:25 AM2021-07-03T04:25:37+5:302021-07-03T04:25:37+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८३ हजार ८०२ पुरुष आणि १ लाख ६१ हजार २७३ महिला अशा एकूण ३ लाख ...
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८३ हजार ८०२ पुरुष आणि १ लाख ६१ हजार २७३ महिला अशा एकूण ३ लाख ४५ हजार ७५ जणांचे लसीकरण झालेले आहे. त्यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या २ लाख ६४ हजार ३५४; तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ८० हजार ७२१ इतकी आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून लसीकरण मोहिमेस गती मिळावी, यासाठी आरोग्य विभागाचे युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता यापुढे दोन पाळीत लसीकरण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. त्यानुषंगाने सकाळी ९ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री ९ वाजता अशा वेळा निश्चित करण्यात आल्या आहे. यासाठी नियोजन करून आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात येणार आहे. लसींचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्याला २ जुलै रोजी कोविशिल्डचे १९ हजार ६०० आणि कोव्हॅक्सिनचे ३३ हजार ६०० डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
...................
एकाच दिवशी ८,२०० जणांना दिली लस
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने चोख नियोजन करून जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांना प्रत्येकी ४०० डोस आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी २०० डोस उपलब्ध करून दिले. या माध्यमातून २ जुलै रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत मोहीम सुरू ठेवून ८,२०० जणांचे लसीकरण करण्यात आले.
..................
स्तनदा मातांनी लस घेण्याचे आवाहन
महिला गरोदर असताना कोरोनाची लस घेणे टाळावे; परंतु प्रसूतीपश्चात लगेच किंवा त्यानंतर कधीही लस घेता येऊ शकते. स्तनदा मातांनी लस घेऊन सुरक्षित व्हावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
................
शेतकरी, शेतमजुरांच्या लसीकरणावर भर
सध्या खरीप हंगाम सुरू असून ग्रामीण भागातील बहुतांश लोक दिवसभर शेतामध्ये कामात व्यस्त असतात. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत लसीकरण शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. यामाध्यमातून विशेषत: शेतकरी व शेतमजुरांच्या लसीकरणावर भर दिला जाणार आहे.
..............................
३,४५,०७५
आतापर्यंत झालेले एकूण लसीकरण
१,८३,८०२
पुरुषांचे लसीकरण
१,६१,२७३
महिलांचे लसीकरण
२,६४,३५४
पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या
८०,७२१
दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या
.................
कोट :
जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत २ लाख ६४ हजार ३५४ जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे; तर ८० हजार ७२१ जणांनी दुसरा डोस घेऊन स्वत:ला सुरक्षित केले आहे. १ लाख ८३ हजार ६३३ जणांना लसीचा दुसरा डोस द्यावा लागणार आहे. त्याचे नियोजन करण्यात आले. नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन लसीकरण करून घ्यावे.
- डाॅ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम