वाशिम जिल्ह्यातील कोरोनाला ५९४ गावांनी वेशीवरच रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 11:32 AM2020-08-14T11:32:04+5:302020-08-14T11:32:12+5:30
जिल्ह्यातील ६८२ पैकी ५९४ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळविले तर केवळ ८८ गावांत कोरोनाचा शिरकाव झाला.
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी, बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांची गावाबाहेरच आरोग्य तपासणी, क्वारंटीनसाठी शासकीय इमारती उपलब्ध करून देणे यासह अन्य उपाययोजना करीत जिल्ह्यातील ६८२ पैकी ५९४ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळविले तर केवळ ८८ गावांत कोरोनाचा शिरकाव झाला.
जिल्ह्यात पहिला रुग्ण हा ग्रामीण भागातच मेडशी (ता.मालेगाव) येथे ३ एप्रिल रोजी आढळून आला होता. लॉकडाऊननंतर बाहेरगावावरून जिल्ह्यातील ग्रामीण भागात जवळपास ६७ हजार नागरीक परतले. गावपातळीवर ग्राम दक्षता समिती, ग्राम सुरक्षा दल स्थापन करून गावांच्या सीमा बंद करणे, आरोग्य तपासणीशिवाय बाहेरच्या व्यक्तीला गावात प्रवेश न देणे, परगावावरून आलेल्या नागरिकांना गावात थेट प्रवेश न देता गावाबाहेर आरोग्य तपासणी करणे, गावात मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करणे, निर्जंतुकीकरण करणे, बी-बियाणे खरेदीसाठी शहरी भागात मोठ्या संख्येने न जाता कृषी विभागाच्या बांधावर खत व बियाणे या उपक्रमात सहभागी होणे यासह शासन, प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे या बळावर जिल्ह्यातील ५९४ गावांनी कोरोनाचा गावात शिरकाव होऊ दिला नाही.
वाशिम तालुक्यात १२१ गावे असून, १८ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला तर १०३ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळविले. रिसोड तालुक्यात १०० ंपैकी १२ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला तर ८८ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळविले. मालेगाव तालुक्यात ११९ पैकी २१ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला तर ९८ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नाही. मंगरूळपीर तालुक्याता ११६ पैकी २० गावात कोरोनाबाधित रुग्ण असून उर्वरित ९४ गावात अजून कोरोनाचा शिरकाव झाला नाही. कारंजा तालुक्यात १३४ पैकी १० गावांत कोरोनाचा शिरकाव झाला तर १२४ गावात कोरोनाचा शिरकाव झाला नाही. मानोरा तालुक्यात ९२ पैकी सात गावांत कोरोनाचा शिरकाव झाला तर ८५ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नाही.
कोरोनामुक्त गावे
पोटी, मोहरी, पारवा, शिवणी रोड, मोझरी, कुंभी, कासोळा, रिठद, कवठा, चिखली, व्याड, वाकद, सवड, भर जहॉगीर, कंकरवाडी, चिंचाबाभर, लोणी बु., कुपटा, इंझोरी, पोहरादेवी, शेंदुरजना, जऊळका रेल्वे, किन्हीराजा, अमानी, वसारी, मनभा, धनज, धामणी, काजळेश्वर, अडोळी.
आरोग्य तपासणीवर दिला भर
बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांची गावाबाहेरच तपासणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राच्यावतीने कॅम्प लावण्यात आले. प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात आली. कोणतीही लक्षणे आढळून न आलेल्या नागरिकांना गावात प्रवेश दिला. गावात सर्वेक्षण केले.
जनजागृतीवर भर
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी यासंदर्भात अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविकांनी जनजागृती केली. घरोघरी जाऊन सर्वेक्षण तसेच आरोग्य तपासणी मोहिमेतही सहभाग नोंदविला. मास्क लावणे, हात वारंवार धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग याबाबत नागरिकांना आवश्यक ते मार्गदर्शनही केले.