कोरोनामुक्त ग्रामपंचायतींना मिळणार लाखोंची बक्षिसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 12:07 PM2021-06-12T12:07:15+5:302021-06-12T12:07:21+5:30
Coronafree Gram Panchayats will get lakhs of prizes : पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षिसे दिली जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ग्रामीण भागातील गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्यांद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण राज्य या संकटातून बाहेर पडावे, यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा योजनेची आखणी करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होऊन महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षिसे दिली जाणार आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.
पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोविड संसर्ग तुलनात्मकदृष्ट्या जास्त प्रमाणात होण्याचा धोका वर्तविला जात आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात कोविडसंबंधी चाचण्या होणे व गावातच संस्थात्मक विलगीकरणाच्या नियमाची चोख अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
सर्दी, ताप, खोकला, हगवण, डोकेदुखी, मधुमेह, अशक्तपणा, फुप्फुसांचे आजार असणाऱ्या रुग्णांना तातडीने कोविड तपासणी करण्यासाठी प्रोत्साहित करणे, येत्या काळात लहान मुलांवर विशेष लक्ष केंद्रित करणे, तसेच पिण्याचे पाणी, शौचालय, पंखे, आदी सुविधा असलेल्या इमारती संस्थात्मक विलगीकरणासाठी निश्चित करणे, अशा इमारतींमध्ये किमान १० बेडची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने ‘कोरोनामुक्त गाव पुरस्कार’ योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.