अक्षय तृतीयेवर कोरोनाचे सावट; उलाढाल ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:41 AM2021-05-13T04:41:28+5:302021-05-13T04:41:28+5:30
वाशिम : सलग दुसऱ्या वर्षीही अक्षय तृतीयेवर कोरोनाचे सावट असून, कडक निर्बंधामुळे सराफा, इलेक्ट्रॉनिक्स् वस्तू, घर खरेदी, वाहन बाजार ...
वाशिम : सलग दुसऱ्या वर्षीही अक्षय तृतीयेवर कोरोनाचे सावट असून, कडक निर्बंधामुळे सराफा, इलेक्ट्रॉनिक्स् वस्तू, घर खरेदी, वाहन बाजार ‘लॉक’ झाल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध आणखी वाढविण्यात आल्याने, शुक्रवारी (दि.१४) अक्षय तृतीया असल्याने बाजारपेठेत ग्राहक आणि व्यावसायिकांचाही मुहूर्त चुकणार आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीया सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी कोणतेही शुभ काम करण्यास नागरिक प्राधान्य देतात. या मुहूर्तावर सोने, वाहन, घर व गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीला जिल्हावासीयांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. त्याचप्रमाणे, काही जण नवीन उद्योग-व्यवसायाचा श्रीगणेशाही याच दिवशी करतात. मात्र, या वर्षी कोरोनामुळे बाजारपेठेत कडक निर्बंध असल्याने सराफा व वाहन व्यावसायिकांसह अन्य व्यावसायिकांनाही मोठा फटका बसत आहे. शासनाने बाजारपेठेत लागू केलेल्या निर्बंधांमुळे सराफा बाजार कडकडीत बंद असल्याने, कोट्यवधींची उलाढाल ठप्प झालेली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विवाह बंधनात अडकणाऱ्या जोडप्यांचीही संख्या मोठी असते. विवाहाचे मुहूर्त अधिक असल्याने, या काळात बाजारपेठेतही उत्साह संचारलेला असतो. मात्र, कडक निर्बंध असल्याने बाजारपेठ कडकडीत बंद आहे. त्यामुळे या मुहूर्तावर बुक झालेल्या, तसेच लग्नसराईकरिता घेतलेल्या दागिन्यांच्या ऑर्डर्स कशा पूर्ण करायच्या, या विवंचनेत व्यावसायिक आहेत. जिल्ह्यात सराफा व्यवसायावर किमान १,५०० ते १,७०० कारागीर उदरनिर्वाह करतात. सराफा बाजारच बंद असल्याने आणि कारागिरांची आर्थिक परिस्थिती ही सर्वसाधारण असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. गतवर्षीही कोरोनामुळे अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकल्याने सराफा व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. हीच परिस्थिती प्लॉट विक्रेते, इलेक्ट्रॉनिक्स व वाहन विक्रेत्यांचीही आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वाहन बाजारात ६ ते ८ कोटीदरम्यान उलाढाल होत असते. सराफा बाजारात दीड ते दोन कोटी, इलेक्ट्रॉनिक्स् बाजारात एक कोटीच्या आसपास तर घर व प्लॉट खरेदी-विक्रीतून ८ ते १० कोटींची उलाढाल होत असते. मात्र, कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही या व्यवसायाला फटका बसणार आहे.
००००००००००
कोरोनामुळे प्लॉट, घर खरेदी-विक्रीच्या बाजारातही म्हणावी तशी तेजी नाही. दरवर्षी अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून घर व प्लॉट खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. सलग दुसऱ्या वर्षीही अक्षय तृतीयेवर कोरोनाचे सावट असल्याने व्यवसाय ठप्प आहे.
- गिरीश लाहोटी
बांधकाम व्यावसायिक, वाशिम
००००
कोट बॉक्स...
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कडक निर्बंध लागू आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षीही अक्षय तृतीयेदरम्यान सराफा प्रतिष्ठाने बंद आहेत. छोटे कारागीर आणि छोटे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
- सुभाष उखळकर
जिल्हाध्यक्ष, सराफा संघटना, वाशिम
००००००
संस्कृतीत मुहूर्त साधून वाहन खरेदीची परंपरा आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वाहन बाजार तेजीत असतो, परंतु सलग दोन वर्षांपासून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर व्यवसाय होऊ शकलेला नाही. त्यामुळे वाहन बाजाराला मोठा फटका बसला आहे.
- रौनक टावरी, दुचाकी वाहन विक्रेता वाशिम
0000000
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध असल्याने वाहन विक्रीवर याचा परिणाम होत आहे. पसंतीचे चारचाकी वाहन मिळावे, याकरिता ग्राहक हे अगोदरच बुकिंग करतात. मात्र, आता कडक निर्बंधामुळे वाहन बाजारात मंदीचे सावट आहे.
- स्वप्निल देशमुख, चारचाकी वाहन विक्रेता वाशिम
000000
अक्षय तृतीयेला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री बऱ्यापैकी होत असते. मात्र, कडक निर्बंध लागू असल्याने बाजारपेठ बंद आहे. याचा फटका इलेक्ट्रॉनिक्स बाजाराला मोठ्या प्रमाणात बसला आहे. जवळपास एक कोटींचा व्यवसाय ठप्प होत आहे.
- नितीन रेघाटे, इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेता
००००