कोरोनाने होणाऱ्या मृत्यूचा आलेख घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:28 AM2021-07-10T04:28:08+5:302021-07-10T04:28:08+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये शिरकाव केला. तेव्हापासून १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत बाधितांचा एकूण आकडा ७ ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये शिरकाव केला. तेव्हापासून १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत बाधितांचा एकूण आकडा ७ हजार ३३४ वर पोहोचला होता. यासह संसर्गाने १५६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद पोर्टलवर घेण्यात आली होती. दरम्यान, साधारणत: १५ फेब्रुवारी २०२१ पासून कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट आली. पहिल्या लाटेच्या तुलनेत ती अधिक तीव्र स्वरूपाची ठरली. तेव्हापासून ८ जुलै २०२१ पर्यंत तब्बल ३४ हजार १९७ नवे रुग्ण निष्पन्न झाले. संसर्गाने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही या कालावधीत मोठ्या प्रमाणात वाढले. १४ फेब्रुवारीपर्यंत १५६ वर असलेला मृत्यूचा आकडा ४६६ ने वाढून आजमितीस ६२२ वर पोहोचला आहे. असे असले तरी १ ते ८ जुलै या कालावधीत कोरोना संसर्गाने मृत्यू झालेल्यांची संख्या केवळ तीन असून संसर्गाने बाधितांच्या प्रमाणातही गेल्या काही दिवसांत लक्षणीय घट झाल्याचे दिसत आहे. यामुळे जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
..........................
कोरोना संसर्गाच्या दोन्ही लाटांचा लेखाजोखा
पहिल्या लाटेत आढळलेले रुग्ण - ७३३४
पहिल्या लाटेत झालेले मृत्यू - - १५६
दुसऱ्या लाटेत आढळलेले रुग्ण - ३४१९७
दुसऱ्या लाटेत झालेले मृत्यू - - ४६६
आतापर्यंत आढळलेले एकूण रुग्ण - ४१५३१
आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू - ६२२
............................
असा वाढत गेला बाधित व मृत्यूंचा आलेख
१ जानेवारी - ६६७२/१४८
१ फेब्रुवारी - ७१५४/१५४
१ मार्च - ८९३४/१६०
१ एप्रिल - १६३९८/१८८
१ मे - २७८८८/२९७
१ जून - ४०१७३/५८३
१ जुलै - ४१४५०/६२०
८ जुलै २०२१ अखेर - ४१५३१/६२२
बाधित/मृत्यू
.......................
१७ खासगी रुग्णालयांतील कोरोना रुग्ण शून्यावर
कोरोनाकाळात संसर्गाने बाधित होणाऱ्यांवर वेळीच उपचार व्हावेत, त्यांची गैरसोय होऊ नये आणि आरोग्य विभागावरही ताण येऊ नये, यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये डेडिकेटेड कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून १७ खासगी रुग्णालयांमधील कोरोना रुग्णसंख्याही शून्यावर आली आहे. त्यामुळे ही रुग्णालये आता नाॅन कोविड रुग्णांसाठीही खुली करून देण्यात आली आहेत.