मोहरमवर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:45 AM2021-08-19T04:45:13+5:302021-08-19T04:45:13+5:30
वाशिम : मोहरमनिमित्त विविध ठिकाणी मुस्लिम बांधवांतर्फे वाझ, मजलीस तसेच मातम मिरवणुका आयोजित करण्यात येतात. कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात ...
वाशिम : मोहरमनिमित्त विविध ठिकाणी मुस्लिम बांधवांतर्फे वाझ, मजलीस तसेच मातम मिरवणुका आयोजित करण्यात येतात. कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. इतर कार्यक्रमांप्रमाणेच यावर्षी मोहरमही साध्या पद्धतीने करण्याबाबत जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
या आदेशानुसार मोहरम महिन्यात १० व्या दिवशी म्हणजेच १९ ऑगस्टरोजी ‘योम-ए-आशुरा’ येत आहे. यानिमित्ताने मातम मिरवणुका काढण्यात येतात. परंतु सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सध्या बंदी असल्यामुळे सार्वजनिक मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे आपापल्या घरात राहूनच मोहरमही साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर भारतीय दंडसंहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित ठाण्याचे उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.