कोरोनाबाधितांचे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:22 AM2021-02-28T05:22:28+5:302021-02-28T05:22:28+5:30
कोरोना चाचणीनंतर रुग्णाचा अहवाल आल्यावर २४ तासांच्या आत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जाते. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना ...
कोरोना चाचणीनंतर रुग्णाचा अहवाल आल्यावर २४ तासांच्या आत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जाते. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना दिल्या जातात, असेही आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात ट्रेसिंग होत नसल्याचे दिसत असून, समन्वयाचा अभाव आहे, की प्रक्रिया शिथिल झाली आहे, असे प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहेत.
---
पॉइंटर्स :
कोरोनाचे एकूण रुग्ण - ८,६२१
बरे झालेले रुग्ण - ७,२७०
उपचार सुरू असलेले रुग्ण - १,१९३
कोरोनाबळी - १५७
---
केस १ : धनज बु येथे २४ फेब्रुवारीला सात जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे संपर्कातील व्यक्तींची माहिती संकलित करण्याचे काम आरोग्य विभागाने सुरू केले; परंतु हाय रिस्क संपर्कातील व्यक्ती वगळता लो रिस्कमधील काही व्यक्तींची माहिती संकलित करण्याची तसदीच घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणीच केली जाऊ शकली नाही.
केस २ : धनज येथीलच पती, पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले, तर मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे पती आणि पत्नीला गृह विलगीकरणात ठेवण्यात आले. त्यांच्यात कोणती लक्षणे दिसत नसली तरी, उपचार केले जात आहेत; परंतु त्यांच्या मुलाचा संपर्क त्यांच्याशी वारंवार येत असतानाही तो आपला व्यवसाय सांभाळत असून, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगबाबत त्याला कोणतीही विचारणा झालेली नाही.
केस ३ : इंझोरी येथे गत महिन्यात एक महिला कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. त्यामुळे तिच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची कोरोना चाचणी करणे अपेक्षित होते; परंतु तसा प्रकार आढळून आला नाही. त्यामुळे या महिलेच्या संपर्कातील व्यक्ती मुक्तपणे गावात फिरताना दिसत होत्या. आरोग्य विभाग किंवा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून कोणतीही माहिती विचारण्यात आली नव्हती.
--------------------
कोट :
दैनंदिन अहवाल दुपारी ४-५ वाजताच्या सुमारास सर्व तालुक्यातील आरोग्य विभागाकडे पाठविला जातो. त्यानंतर पुढील २४ तासांत त्यांनी त्यांच्या हद्दीतील रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी करणे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे बंधनकारक आहे. प्रत्येक रुग्णाच्या मागे सध्या १५ ते २२ जणांचे ट्रेसिंग केले जात आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नसल्यास कठोर सूचना देण्यात येतील.
- डॉ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम