CoronaVirus : कारंजात सर्वेक्षणासाठी सरसावले १३० शिक्षक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 03:57 PM2020-04-28T15:57:07+5:302020-04-28T15:57:15+5:30
१३० शिक्षकांची टीम तयार करून कारंजातील प्रत्येक घराच्या सर्वेक्षणास मंगळवार, २८ एप्रिलपासून घरोघरी सर्वेक्षणास सुरूवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून विविध स्वरूपातील उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येथील तहसीलदार धीरज मांजरे यांनी १३० शिक्षकांची टीम तयार करून कारंजातील प्रत्येक घराच्या सर्वेक्षणास मंगळवार, २८ एप्रिलपासून घरोघरी सर्वेक्षणास सुरूवात केली आहे. यामाध्यमातून अन्य जिल्हे आणि परराज्यातून कारंजात विनापरवानगी दाखल होणाºयांवर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा कारंजा शहरात प्रसार होऊ नये, यासाठी तहसीलदार मांजरे यांच्यासह ठाणेदार सतीश पाटील आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी विविध उपाययोजनांची आखणी केली आहे. जिल्हाबंदीचे निर्देश असताना छुप्या मार्गाने कारंजात दाखल होणाºयांवर कारवाई केली जात आहे. त्यासाठी १८ चेकपोस्ट तयार करण्यात आल्या. त्यावर १०८ शिक्षक, १८ कोतवाल, १८ पोलीस पाटील यांच्यासह सरपंच, तलाठी नियुक्त करण्यात आले. त्याची अपेक्षित फलश्रृती होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कारंजा शहरातील घरोघरी सर्वेक्षणासाठी नगर परिषद व जिल्हा परिषद शाळांवर कार्यरत एकूण १३० शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून संबंधित शिक्षकांनी २८ एप्रिलपासून सर्वेक्षण सुरू केले आहे. अन्य जिल्हे व परराज्यातून येणाºया व्यक्तींवर ‘वॉच’ ठेवण्यासोबतच ताप, खोकला, सर्दी अशाप्रकारची लक्षणे असणाºया रुग्णांची माहिती घेऊन आवश्यक ती तपासणी करण्याच्या सूचना देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.