CoronaVirus : आणखी २० पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या २३७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 05:32 PM2020-07-12T17:32:21+5:302020-07-12T17:32:55+5:30
कोरोनाबाधितांची संख्या आता २३७ वर पोहोचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत २० रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याती कोरोनाबाधितांची संख्या आता २३७ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यातील मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रुग्ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता. त्यानंतर उत्तरप्रदेशमधील कोरोनाबाधीत ट्रकच्या क्लिनरचा वाशिममध्ये मृत्यू झाला. त्याच ट्रकचा चालक कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले होते. मे महिन्यापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रित होती. मे महिन्याच्या अखेरीस परराज्य, परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरीक जिल्ह्यात परतले. बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांमुळे जून महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने शतक ओलांडले. सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे आदी लक्षणे असणाºया रुग्णांचेदेखील स्वॅब घेण्याची व्यवस्था तालुकास्तरावर कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आली. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. १ ते १२ जुलै या ११ दिवसात तब्बल १२४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात गेल्या १८ तासांत ३२ रुग्णांची भर पडली आहे. शनिवारी रात्री उशिरा १२ लोकांचा कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्ह आला, तर रविवारी दुपारपर्यंत त्यात २० रुग्णांची भर पडली. शनिवारी रात्री प्रशासनास प्राप्त झालेल्या अहवालानुसार वाशिम शहरातील गंगुबाई प्लॉट परिसरातील ०५, हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील ०४, मालेगाव शहरातील अकोला नाका परिसरातील ०१ आणि कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील ०२ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्याशिवाय रविवारी दुपारी प्राप्त अहवालानुसार सुंदरवाटिका (वाशिम) परिसरातील एकाच कुटुंबातील ४ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच कामरगाव (ता. कारंजा लाड) येथील २ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. दरम्यान, रविवारी दुपारीच रिसोड तालुक्यातील १४ जणांचे कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता २३७ वर पोहोचली असून, त्यातील ५ जणांचा मृत्यू झाला, तर १०५ लोक बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.