CoronaVirus : ‘कोविड केअर सेंटर’मध्ये २४६४ रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 10:48 AM2020-04-25T10:48:32+5:302020-04-25T10:52:33+5:30
दोन दिवसात सर्दी, ताप व खोकला असणाऱ्या एकूण २४६४ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात सहा स्वतंत्र ‘कोविड केअर सेंटर’ २२ एप्रिलपासून सुरु केले असून, २२ व २३ एप्रिल अशा दोन दिवसात सर्दी, ताप व खोकला असणाऱ्या एकूण २४६४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. २४ एप्रिल रोजी सायंकाळपर्यंत ७०० च्या आसपास रुग्ण तपासण्यात आले.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेला एकमेव रुग्णही बरा झाला आहे. परंतू यापुढेही जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. ताप, सर्दी व खोकला हे तसे नेहमीचे आजार आहेत. मात्र, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये सुद्धा अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसणाºया व्यक्तींची तपासणी व उपचार करण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे सहा ‘कोविड केअर सेंटर’ २२ एप्रिलपासून सुरु करण्यात आली. याठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण व साहित्य, औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जिल्ह्यातील ज्या नागरिकांना ताप, सर्दी व खोकला असा त्रास आहे, त्यांनी उपचारासाठी इतर कुठेही न जाता आपल्या नजीकच्या कोविड केअर सेंटरमध्येच येवून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी २४ एप्रिल रोजी केले.
असे आहेत तालुकानिहाय ‘कोवीड केअर सेंटर’
वाशिम तालुका : अनुसूचित जाती मुलींची निवासी शाळा, हिंगोली रोड, सुरकंडी
रिसोड तालुका : अनुसूचित जाती मुलांची निवासी शाळा, सवड
मालेगाव तालुका : नवीन तहसील कार्यालय, मुख्य इमारत, मालेगाव
मंगरूळपीर तालुका : अल्पसंख्याक वसतिगृह, मंगरूळपीर
कारंजा तालुका : एम.बी. आश्रम, मुतीर्जापूर रोड, झाशी राणी चौक जवळ, चंदनवाडी
मानोरा तालुका : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), मानोरा
सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रुग्णसेवा
ताप, सर्दी व खोकला आदी लक्षणे दिसणाºया व्यक्तींची तपासणी, उपचार करण्यासोबतच त्यांच्या प्रवासाची नोंद सुद्धा या कोविड केअर सेंटरमध्ये घेतली जात आहे. २२ एप्रिलपासून रोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोविड केअर सेंटर सुरु असतात, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी सांगितले.
कोरोना विषाणू संसर्ग झाल्यानंतर होणाºया कोविड-१९ आजाराच्या लक्षणांमध्ये सुद्धा ताप, सर्दी व खोकला या लक्षणांचा समावेश आहे. त्यामुळे असा त्रास असलेल्या रुग्णांची स्वतंत्र तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार करणे यासाठी प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले. दोन दिवसात २४६४ जणांची तपासणी केली.
-डॉ. अविनाश आहेर, डीएचओ