CoronaVirus : नागरिकांनो, सुरक्षितता बाळगा - हृषीकेश मोडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 04:45 PM2020-04-25T16:45:34+5:302020-04-25T16:45:43+5:30
जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्याशी साधलेला हा संवाद...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यासह देशातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या तुलनेत मात्र वाशिम जिल्ह्यात गत २२ दिवसात एकही नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळला नाही. तसेच मेडशी येथील एकमेव कोरोनाबाधीत रुग्णाचा अंतीम अहवालही निगेटिव्ह आल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. कौतुकास्तपद बाब म्हणजे केंद्र सरकारने २१ एप्रिल रोजी राज्यातील चार जिल्ह्यांनी राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व केलेल्या उत्कृष्ट अंमलबजावणीबाबत कौतूक केले. त्यात वाशिम जिल्ह्याचा समावेश होता. या विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्याशी साधलेला हा संवाद...
जिल्ह्यात ‘कोरोना’ला प्रतिबंधासाठी कुठल्या उपाययोजना राबविल्या?
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी विविध स्वरूपातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. जिल्ह्याच्या सीमा तत्काळ बंद करून जिल्ह्यात विनापरवाना दाखल होणारी वाहने व नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. कायदा मोडणाºया अनेकांची वाहने जप्त करण्यात आली. गावपातळीवर ग्रामस्तरीय समिती स्थापन करून परराज्य, महानगरातून आलेल्या नागरिकांची माहिती संकलीत करण्यात आली. त्यानुसार, नागरिकांची आरोग्य विभागातर्फे तपासणी करून संदिग्ध असल्यास १४ दिवस घरातच अलगीकरण करून राहण्याचा सल्ला संबंधितांना देण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले.
परजिल्ह्यातून किती मजूर परतले?
रोजगारासह विविध कारणांमुळे महानगरात गेलेले वाशिम जिल्ह्यातील २७ हजार ५०९ कामगार, मजूर हे ३१ मार्चपर्यंत आपापल्या गावी परतले आहेत. त्या सर्वांची आरोग्य तपासणी करून १४ दिवस घरातच राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या होत्या. संबंधितांचा ‘होम क्वारेंटिन’ कालावधी संपुष्टात आला असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे, पण या नागरिकांनी यापुढेही आरोग्यासंदर्भात खबरदारी घेणे आवश्यक आहे.
कोरोना सुरक्षेसंबंधी नागरिकांना काय संदेश द्याल ?
मेडशी (ता. मालेगाव) येथील एकमेव कोरोना बाधित व्यक्तीचा अंतीम थ्रोट स्वॅब अहवाल ‘निगेटिव्ह’ आला असून त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. ही जिल्ह्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. असे असले तरी आगामी काही दिवसांत ‘कोरोना’चा शिरकाव जिल्ह्यात होवू नये, यासाठी नागरिकांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. ३ मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असून नागरिकांनी त्याचे पालन करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.