CoronaVirus : कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील कारंजाच्या डॉक्टरसह १३ जणांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 04:12 PM2020-05-10T16:12:26+5:302020-05-10T16:14:31+5:30
डॉक्टरसह १३ जणांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने कारंजासह मानोरा तालुक्याला मोठा दिलासा मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील एक मधूमेही रुग्ण कारंजातील एका खासगी रुग्णालयात ४ मे रोजी नियमित तपासणी करून गेला. या रुग्णाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे ६ मे रोजी अहवालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे या रुग्णाची तपासणी करणाºया कारंजातील ‘त्या’ डॉक्टरसह १३ जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन कक्षात दाखल करून या सर्वांचे थ्रोट स्वॅब नमुने ९ मे रोजी तपासणीसाठी अकोला येथे पाठविले होते. या सर्वांचे अहवाल १० मे रोजी दुपारी निगेटिव्ह आल्याने कारंजेकरांना मोठा दिलासा मिळाला.
नेर तालुक्यातील एक मधूमेही रुग्ण कारंजातील एका खासगी रुग्णालयात ४ मे रोजी नियमित तपासणी करून गेला. या रूग्णाला कोरोना संसर्ग झाल्याचा आहवाल ६ मे रोजी सायंकाळी ६ वाजतादरम्यान प्राप्त झाल्यामुळे कारंजातील त्या डॉक्टरसह ९ व्यक्ती व कोरोनाबाधित रुग्णाचे कारंजातील ४ नातेवाईक अशा एकूण १३ जणांना वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. तपासणीअंती ९ मे रोजी या १३ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यांचा तपासणी अहवाल १० मे रोजी दुपारी प्र्राप्त झाला असून, या सर्वांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली.
दरम्यान, कारंजातील त्या खासगी डॉक्टरच्या संपर्कातील जवळपास २४० जण आल्याने या सर्वांची आरोग्य तपासणी ८ व ९ मे रोजी करण्यात आली होती. यापैकी कुणालाही कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. सुरक्षिततेसाठी या २४० जणांना घरातच राहण्याचा सल्ला दिला होता. आता त्या खासगी डॉक्टरसह १३ जणांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने कारंजासह मानोरा तालुक्याला मोठा दिलासा मिळाला.
दुसरीकडे मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथील एक रुग्ण हा वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात कोरोनाबाधित असल्याचे १० मे रोजी दुपारी स्पष्ट झाले. त्यामुळे मंगरूळपीर तालुक्यात खळबळ उडाली असून, हा रुग्ण कुणाच्या संपर्कात आला का? याची माहिती घेतली जात आहे. हा रुग्ण उपचारासाठी ८ मे रोजी वाशिम जिल्ह्यातून सुरूवातीला अकोला येथे आणि त्यानंतर वर्धा जिल्ह्यात गेला होता.
माहितीचे संकलन
मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथील रूग्ण सध्या सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहे. त्याच्या संपर्कात कोण-कोण आले याची माहिती घेण्यासाठी आरोग्य पथक १० मे रोजी कवठळ येथे दाखल झाले.