CoronaVirus : तालुकास्तरावर ‘थ्रोट स्वॅब’ नमुने घेण्याची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 10:42 AM2020-05-29T10:42:05+5:302020-05-29T10:42:20+5:30
संदिग्ध रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्याची सुविधा आता तालुकास्तरावरच उपलब्ध झाली आहे.
- सुनील काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संदिग्ध रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्याची सुविधा आता तालुकास्तरावरच उपलब्ध झाली आहे. त्यासाठी लागणाऱ्या पुरेशा ‘व्हीटीएम कीट’ (व्हायरल ट्रान्सपोर्ट मिडियम) शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडे सुपूर्द केल्या आहेत. तालुका मुख्यालयी असणाºया ‘कोव्हीड केअर सेंटर’मध्ये त्यासाठी तज्ज्ञांची नेमणूकही करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, कोरोना विषाणू संसर्गाच्या संदिग्ध रुग्णांच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेत असताना विशेष खबरदारी बाळगावी लागते. ही सुविधा पुर्वी केवळ जिल्हा सामान्य रुग्णालयातच उपलब्ध करून देण्यात आली होती; मात्र सदी, खोकला, ताप आदी लक्षणे असलेल्या संदिग्ध स्वरूपातील रुग्णाची त्यात गैरसोय व्हायची.
यासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील अलगीकरण कक्षात संदिग्ध रुग्णांची गर्दीही वाढायला लागली होती. त्यामुळे आता तालुकास्तरावरील ‘कोव्हीड केअर सेंटर’मध्येच संदिग्ध रुग्णांच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेऊन तो परस्पर ‘व्हीआरडीएल लॅब’कडे पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यासाठी विशेष प्रशिक्षण देऊन तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. याकरिता लागणाºया ‘व्हीटीएम कीट’ दैनंदिन रुग्णवाहिकेव्दारे तालुकास्तरावर पाठविण्यात येत आहेत. यामुळे संदिग्ध रुग्णांची सोय होण्यासोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयावरील अतीरिक्त ताण कमी झाला आहे.
६२६ कीट उपलब्ध
राज्यातील जिल्ह्यांना ‘पीपीई कीट’ मोजक्याच उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वाशिममध्ये जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे सद्या २४८ आणि जिल्हा शल्य चिकित्सकांकडे ३७८ अशा ६२६ कीट उपलब्ध असल्याची माहिती प्राप्त झाली.
जिल्ह्याला ९ हजार ‘व्हीटीएम कीट’ उपलब्ध!
संदिग्ध रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यासाठी वापरल्या जाणाºया ९ हजार ‘व्हीटीएम कीट’ शासनाने जिल्ह्याला उपलब्ध करून दिल्या आहेत. गरजेनुसार आणि मागणीनुसार त्या ‘कोव्हीड सेंटर’कडे दैनंदिन पाठविण्यात येत आहेत.
जिल्हास्तरावरील ताण कमी करण्यासाठी आता त्या-त्या तालुक्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या संदिग्ध रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेण्याची आणि ते अकोला येथील ‘व्हीआरडीएल लॅब’कडे पाठविण्याची व्यवस्था तालुकास्तरावरील ‘कोव्हीड केअर सेंटर’मध्येच उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांची सोय होण्यासोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचाºयांवर ओढवणारा अतिरिक्त ताण कमी झाला आहे. मागणीनुसार आवश्यक तेवढ्या ‘व्हीटीएम कीट’ जिल्हास्तरावरून पाठविण्यात येत आहेत.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम