CoronaVirus : ‘होम क्वारंटीन’ नागरिकांचा घराबाहेर वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 10:41 AM2020-05-16T10:41:47+5:302020-05-16T10:41:54+5:30
काही जण घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनात येत असल्याने त्यांची रवानगी जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात केली जात आहे.
वाशिम : परराज्य, परजिल्ह्यातून येणाऱ्या मजूर, कामगारांना घरातच १४ दिवस राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गत आठ दिवसात जिल्ह्यात दोन हजार मजूर, कामगार आल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या दप्तरी आहेत. रेड झोनमधून येणाºया कामगार, मजुरांमुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून या सर्वांनी घरातच राहणे आवश्यक आहे. परंतू, काही जण घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनात येत असल्याने त्यांची रवानगी जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात केली जात आहे. गत आठवड्यात जवळपास १० ते १५ जणांची रवानगी झाली आहे.
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनामार्फत लॉकडाउन व संचारबंदी लागू केलेली आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात वाशिम जिल्ह्यातील तसेच परराज्यातील मजूर अडकले होते. या मजूरांना आपापल्या गावी जाण्याची मुभा मिळाल्याने ते आपापल्या गावाकडे मिळेल त्या वाहनाने परतत आहेत. गत आठ दिवसात जिल्हयात जवळपास दोन हजार मजूर परतल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. या मजुर, कामगारांना जिल्हा परिषद शाळा, शासकीय इमारती किंवा त्यांच्या घरात व्यवस्था असेल तर तेथे ‘होम क्वारंटीन’ करण्यात आले. १४ दिवस घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या. तथापि, या सुचनांकडे दुर्लक्ष करीत अनेकजण गावात फिरत असल्याचे निदर्शनात येत आहे. कारंजा, रिसोड तालुक्यातील १० ते १५ जण गावात फिरत असल्याचे आढळून आल्याने त्यांची रवानगी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली. मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी येथील सहा लोकांना जिल्हा परिषद शाळेत ‘क्वारंटीन’ करण्यात आले; मात्र त्यांच्यातील काहीजण दारू पिऊन गावभर फिरत असून मज्जाव केला असता, सरपंच व पोलिस पाटील यांना शिविगाळ करित असल्याचा गंभीर प्रकार १४ मे रोजी घडला होता.
‘होम क्वारंटीन’चा नियम न पाळल्यास कोरोना संसर्गाचा धोका
४१५ मे रोजी परजिल्ह्यातून येणाºया एका महिलेला कोरोनासंसर्ग झाल्याची बाब समोर आली. त्यामुळे परराज्य तसेच परजिल्ह्यातून येणाºया मजूर, कामगारांनी १४ दिवस घरातच राहणे आवश्यक आहे. मात्र, काही जण गावात बिनधास्त फिरत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.